प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिन आज जगभरात ईद-ए-मिलाद म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बेळगावातही आज भक्तिभावाने ईद-ए-मिलाद साजरा करण्यात आला.
बेळगावातील फोर्ट रोडवर मंगळवारी सीरत कमिटीच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम धर्माचा ध्वज लावून मुस्लिम बांधवानी प्रार्थना केली. दरवर्षी ईद-ए-मिलादनिमित्त ध्वज मिरवणूक काढण्यात येते.

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मिरवणूक रद्द करून साधेपणाने ईद-ए-मिलाद साजरा करण्यात आला. यावेळी मुस्लिम धर्मगुरू, नगरसेवक, विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुफ्ती मंजूर आलम यांनी सांगितले की, प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्त आज जगभरात सुख, शांती, समाधान नांदू दे अशी प्रार्थना करण्यात आली आहे. लोकांनीही कोरोना मार्गसूचीचे पालन करत ईद साजरी करावी असे आवाहन त्यांनी केले,
डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी याप्रसंगी उपस्थित राहून मुस्लिम बांधवाना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. फ्लो
यावेळी बोलताना डीसीपी डॉ. आमटे म्हणाले, कोविड मार्गसूचीचे अनुसरण करून मुस्लिम बांधव ईद-ए-मिलाद साजरा करत आहेत ही समाधानाची बाब आहे. सण सुरळीत साजरा व्हावा यासाठी शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. मिरवणुकीस परवानगी दिलेली नाही.
यावेळी सीरत कमिटीचे अध्यक्ष अकबर बागवान, नगरसेवक अजीम पटवेगार आदी उपस्थित होते.


Recent Comments