Vijayapura

काँग्रेसचे प्रचाराचे वाहन विजापूर जिल्ह्यात जप्त

Share

 विनापरवानगी नेण्यात येत असलेले काँग्रेसचे प्रचाराचे वाहन पोलिसांनी जप्त केल्याची घटना सिंदगी मतदारसंघातील कन्नोळी निवडणूक चेकपोस्टवर घडली.

: सिंदगी पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी बेंगळूरहून सिंदगीला जात असलेले काँग्रेस पक्षाचे प्रचाराचे वाहन जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आले. विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, एआयसीसी सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला, राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे या वाहनातून सिंदगी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचार करणार होते.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, सिद्दरामय्या, शिवकुमार आदी काँग्रेस नेत्याचे बॅनर्स, स्टिकर्स लावलेले हे भाडोत्री वाहन चेक पोस्टवर अडवून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी तथा मुख जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले. परवानगी पत्र आणेपर्यंत हे वाहन सोडण्यात येणार नाही असे सांगून निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी ते ताब्यात घेतले.

 

 

Tags: