Chikkodi

चालकाला गुंगीचे औषध पाजून ३१ लाखांचे टायर्स लुटले ! त्रिकुटाला अटक

Share

 ट्रक चालकांना चहातून गुंगीचे औषध पाजून लुटणाऱ्या खतरनाक टोळीच्या मुसक्या आवळण्यात चिक्कोडी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

होय, ट्रक चालकांना चहातून झोपेच्या गोळ्या मिक्स करून पाजून लुटण्याचा फंडा या टोळीचा होता. ८ ऑक्टोबररोजी तमिळनाडुतील चेन्नईहून मुंबईकडे जाणाऱ्या टायरची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चालकाला त्यांनी झोपेच्या गोळ्या मिक्स केलेला चहा पाजला होता.

त्यानंतर ट्रकमधील ३१ लाख रुपये किंमतीचे टायर्स लुटून पोबारा केला होता. ट्रक चालक रणजित याने दिलेल्या तक्रारीवरून चिक्कोडी पोलिसांनी कसून तपास करून या प्रकरणी एका त्रिकुटाला शिताफीने अटक केली आहे. अबिद जिम्मेखान, अश्विन जैन आणि रिझवान नुरुद्दीन अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत. १० ऑक्टोबररोजी या तिघांनी ट्रक चालक रणजित याला झोपेच्या गोळ्या मिक्स केलेला चहा पाजला. त्यामुळे चालक रणजित याला गाढ झोप लागली. हीच संधी साधून या तिघांनी संपूर्ण ट्रक अनलोड करून टायर्स लांबविले. त्यानंतर चालक रंजितला ट्रकसह चिक्कोडीजवळ सोडून देऊन पोबारा केला.

त्यानंतर जाग आल्यावर चालक रणजितने चिक्कोडी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चिक्कोडी पोलिसांची कसून तपास करून या त्रिकुटाला शिताफीने अटक केली. चौकशीत त्यांनी आणखी एका खळबळजनक प्रकरणाची कबुली दिली. टायर्सच्या लुटीप्रमाणेच बिस्किटांची वाहतूक करणारा ट्रकही लुटल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी त्यानंतर त्यांच्याकडून ३१ लाखांच्या टायर्ससह १८ लाख रुपये किमतीची बिस्किटे भरलेला ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

 

 

Tags: