Belagavi

सीआयएसएफ सायकल रॅलीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत

Share

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सीआयएसएफतर्फे काढण्यात आलेल्या सायकल रॅलीचे बेळगावमध्ये आगमन झाले. या सायकल रॅलीचे स्वागत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले. गुरुवारी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते हिरवा बावटा दाखवून रॅलीला चालना देण्यात आली.

३१ ऑक्टोबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकार संचालित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीचे आज बेळगावमध्ये आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.

राष्ट्रीय एकत्रीकरणासाठी म्हण कार्य केलेले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन आचरणात आणण्यात येतो. या औचित्याने भारतीय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीने केरळ येथील तिरुवनंतपुरमपासून गुजराथ येथील केवाडिया पर्यंत सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर २०२१ पासून तिरुवनंतपूरम येथून सुरु झालेली हि रॅली ३१ ऑक्टोबर रोजी गुजराथ येथे पोहोचणार आहे.

आज रॅलीचा १६वा दिवस असून ११५० कि. मी. चा प्रवास करून हि रॅली आज बेळगावमधील अशोक सर्कल येथे आली. बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, खासदार मंगला अंगडी, शहर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन आणि एसीपी सदाशिव कट्टीमनी आदींसह इतर अधिकारी या सायकल रॅलीवेळी उपस्थित होते. रॅलीमध्ये सहभाग घेतलेल्या १५ सायकलस्वारांचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले.

यासंदर्भात बोलताना सीआयएसएफ डेप्युटी कमांडंट म्हणाले, सदर सायकल रॅली या महिन्याच्या ३१ तारखेला गुजराथला पोहोचणार आहे. राष्ट्रीय एकता दिन तसेच सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीच्या निमिताने हि रॅली ३१ रोजी गुजराथ येथे पोहोचेल.

यानंतर जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ बोलताना म्हणाले, राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारी ही रॅली आज बेळगावमध्ये आली असून याचा आपल्याला आनंद होत आहे. सायकल रॅलीत सहभागी झालेल्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

खासदार मंगला अंगडी यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. रॅलीत सहभागी झालेले सायकलस्वार हे पोलादी पुरुषाप्रमाणे असून पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हाती घेतलेल्या या उपक्रमाला आपण शुभेच्छा देत आहोत, असे अंगडी म्हणाल्या.

पोलीस आयुक्त के. त्यागराजन यांनीही या सायकल रॅलीला शुभेच्छा दिल्या. तसेच राष्ट्रीय एकतेसाठी सुरु करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत आनंददायी असल्याचे ते म्हणाले. या रॅलीला सहभागी झालेल्यांचे त्यागराजन यांनी कौतुक केले.

Tags: