अनेक असुविधांच्या जाळ्यात अडकलेल्या आणि कोविड काळापासून टीकेचा भडीमार होणाऱ्या बीम्समध्ये सध्या सुधारणा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या बीम्समधील स्वयंपाक खोलीचा कायापालट होत असून मॉडर्न किचनच्या धर्तीवर हे स्वयंपाक घर बनविण्यात येत आहे. या मॉडर्न किचनमधून रुग्णांना आता रुचकर जेवण देखील मिळणार आहे.

बेळगाव जिल्हा रुग्णालय हे गरिबांसाठी संजीवनी आहे. परंतु असुविधेच्या जाळ्यात अडकलेले बीम्स रुग्णालय हे कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान टीकेचे धनी ठरले. विभागीय आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी बीम्स ची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर बीम्समध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा होत असल्याचे आढळून आले आहे. आता बीम्समध्ये सुसज्ज अशा किचनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बीम्समधील रुग्णांना उत्तम प्रतीचे जेवण आणि अल्पोपहार देण्यात येतात असून पाचशेहे रुग्णांना जेवण देण्याचे सामर्थ्य बीम्स पाकगृहात आहे. सध्या बीम्समध्ये ३१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.सर्व रुग्णांना सकाळी ६ वाजता चहा, ८ वाजता अल्पोपहार देण्यात येतो. ब्रेड, केळी, अंडी, उप्पीट, पोहे यासारखे पदार्थ अल्पोपाहारात देण्यात येतात. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात भात, आमटी, चपाती यासह विविध भाज्या, दिवसातून दोन वेळा दूध देण्यात येते. त्याचप्रमाणे नॉर्मल डाएट आणि स्पेशल डाएटनुसारही जेवण देण्यात येते. या आहारामध्ये गंजीचाही समावेश असतो. मधुमेही रुग्णांना पीडियाशुअर कमर्शियल फॉर्मुलानुसार आहार देण्यात येतो. तसेच लहान मुलांना दूध, ब्रेड, कॉम्प्लॅन देण्यात येते. यासंदर्भात डाएटिशियन मधुश्री यांनी आमच्या इन न्यूजला माहिती दिली. कोणत्या प्रकारचे रुग्ण बीम्समध्ये येतात, त्यानुसार त्यांना जेवण, अल्पोपहार, २ वेळा चहा, आणि मधुमेही रुग्णांना शुगरलेस चहा देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.
इतकेच नाही तर बीम्सच्या या मॉडर्न किचनमध्ये आता बरीच नवीन मशिनरी देखील दाखल झाली आहे. कोल्ड स्टोरेजसाहित ५०किलो क्षमतेचे स्टीम कुकर, नवीन प्लेट्स, भाज्या चिरण्यासाठी मशीन देखील आणण्यात आलेली आहेत. बीम्सच्या स्वयंपाक गृहात प्रथमच अशापद्धतीने सुधारणा झाली असून यासाठी सर्व संचालक, आरसी, एमएस, डीएस, आरएमओ यांचे मी आभार मानते असे मधुश्री यांनी सांगितले.
यावेळी रुग्णाचे नातेवाईकी निंगाप्पा करडीगुद्दी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले कि, आपण सवदत्ती तालुक्यातील करीकट्टी या गावातून आलो असून माझ्या पत्नीचे इथे सिझेरियन झाले आहे. काळ सकाळी आपण रुग्णालयात आल्यानंतर रुग्णालयातर्फे आम्हाला २ वेळचा नाश्ता, जेवण देण्यात आले असून आपण रुग्णालय प्रशासन, कर्मचाऱ्यांचे आभारी आहोत. अशाचपद्धतीने हे कार्य सुरु ठेवावे, असा सल्ला निंगाप्पा करडीगुद्दी यांनी दिला.
कोविड काळात टीकांचा भडीमार होणारे बीम्स आता सुधारणेच्या मार्गावर असून आगामी काळात गरीब जनतेसह सर्वसामान्य नागरिकांनाही बीम्स च्या सुविधांचा लाभ व्हावा, तसेच या सुविधा सतत अशाच प्रगतीपथावर राहाव्यात अशी अपेक्षा आहे.


Recent Comments