आपली मुलगी परधर्मीय युवकावर प्रेम करत असल्याने मुलीच्या पालकांनीच सुपारी देऊन प्रियकराचा खून करविला. सुपारी घेतलेल्या मारेकऱ्यांनी त्याचे धड आणि शीर वेगवेगळे करून रेल्वे ट्रॅकवर टाकून दिले. मात्र पोलिसांनी कसून तपास करत मुलीच्या पालकांसह १० जणांना अटक केली. याबाबत सादर आहे एक खास रिपोर्ट !
२८ सप्टेंबरच तो दिवस. खानापूर शहराबाहेरून जाणाऱ्या रेल्वे रुळावर एक अज्ञाताचा मृतदेह सापडल्याची खबर रेल्वे पोलिसांना मिळाली. हात-पाय बांधलेल्या अवस्थेतील एका युवकाचा तो धड-शीर वेगवेगळे झालेला मृतदेह होता. अधिक तपासासाठी रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण बेळगाव पोलिसांकडे वर्ग केले. पोलिसांनी आव्हानात्मक तपास करून त्याच्या मुळाशी जात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
अरबाज मुल्ला नामक मुस्लिम युवकाचे श्वेता नामक हिंदू युवतीवर २ वर्षांपासून प्रेम होते. ते माहित होताच श्वेताच्या पालकांनी अरबाजला बोलावून तिचा नाद सोडण्यास समजावून सांगितले. मात्र त्याने दाद न दिल्याने पुंडलिक महाराज आणि बिर्जे नामक दोघांनी अरबाजला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात २६ सप्टेंबरला अरबाजला खानापूरला बोलावून समझोत्याची चर्चाही करण्यात आली होती. मात्र अरबाजने त्याला दाद न दिल्यानेच त्याला प्राणाला मुकावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्लो
अरबाजचा खून कसा झाला हा या प्रकरणातील कुतूहलाचा विषय. खुद्द श्वेताचे वडील इराप्पा आणि आई सुशीला यांनीच मुलीच्या प्रियकराच्या खुनाची सुपारी दिली. पुंडलिक महाराज याने या हत्येचा प्लॅन तयार केला. अरबाज अलीकडे बेळगावातील ज़मनगरमध्ये रहात होता. कुतुबुद्दीन बेपारी नामक एकाकडून अरबाजला ‘तुझ्याशी बोलायचे आहे, ये’ असे सांगून खानापूरला बोलावून घेण्यात आले. श्वेताच्या आई-वडील आणि पुंडलिक महाराजसह एकूण १० जणांनी मिळून अरबाजच्या हत्येचा कट रचून
२८ सप्टेंबरला त्याचा खून करविला असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. कोणाला संशय येऊ नये, तपासाची दिशा चुकवी म्हणून त्याचे हातपाय बांधून मृतदेह खानापूरजवळ रेल्वेरुळावर टाकून देण्यात आला होता असे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.
या खळबळजनक खुनाच्या तपासासाठी बैलहोंगल डिवायएसपींच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. या पथकाने खुनाची सुपारी घेतलेल्या पुंडलिक महाराजाची चौकशी केल्यावर या खुनाचे रहस्य उलगडले. या प्रकरणी पोलिसांनी श्वेताचे वडील इराप्पा कुंभार, आई सुशीला, गणपती गोंधळी, कुतूबुद्दीन बेपारी, मारुती गोंधळी, प्रशांत पाटील, मंजू गोंधळी, प्रवीण पुजारी, श्रीधर डोनी यांच्यासह एकूण १० जणांना अटक केली असून त्यांना खानापूर न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
दरम्यान, अनेक संघटनांनी हे प्रकरण लावून धरत अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आरोपीना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अल्पसंख्यांक समुदायाने आरोपीना संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
क्राईम ब्युरो, आपली मराठी, बेळगाव.
Recent Comments