Belagavi

बडालअंकलगी भिंत अंगावर कोसळून सातजणांचा बळी; सहा मृत एकाच कुटुंबातील 

Share

 गेले  असलेल्या संततधार पावसामुळे भिंत अंगावर कोसळून एकाच कुटुंबातील सहाजणांसह एकूण सातजणांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना बेळगाव तालुक्यातील बडालअंकलगी येथे बुधवारी सायंकाळी उशिरा घडली. जुन्या घराची पाहणी करण्यासाठी गेले असता या कुटुंबावर काळाने घाला घातला

होय, बेळगाव तालुक्यातील बडालअंकलगी येथे बुधवारी सायंकाळी मृत्यूचे थैमान पहायला मिळाले. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

बडालअंकलगी येथील भीमाप्पा खनगावी यांनी जुन्या घरावर नवीन छत बसविण्याचे काम सुरू केले होते. त्यासाठी या घराच्या बाजूलाच पत्र्याचे शेड बांधून आपले कुटुंब तेथे हलविले होते. बुधवारी सायंकाळी ७.४५च्या सुमारास पावसाचा जोर ओसरल्यामुळे त्या कामाची पाहणी करण्यासाठी ते कुटुंबियांसह जुन्या घरी गेले होते. त्याचवेळी समोरच्या घरातील काशव्वा विठ्ठल होळेप्पनावर ही ८ वर्षांची बालिकाही त्यांच्यासोबत गेली होती. त्याचवेळी काळाने आपला डाव साधला. सगळेजण घराची पाहणी करत असतानाच अचानक घराची भीतीनं त्यांच्या अंगावर पडली आणि ते सगळेजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांनी उपचारांसाठी इस्पितळात नेताना वाटेतच प्राण सोडला.

या दुर्घटनेत गंगव्वा भीमाप्पा खनगावी, वय ८०, अर्जुन हणमंत खनगावी, वय ५०, त्याची पत्नी सत्यव्वा अर्जुन खनगावी, वय ४५, मुलगी पूजा अर्जुन खनगावी, वय ८, लक्ष्मी अर्जुन खनगावी, वय १५, सविता भीमाप्पा खनगावी, वय ३० आणि पूजाची मैत्रीण काशव्वा विठ्ठल होळेप्पनावर, वय ८ या ७ जणांवर काळाने घाला घातला. सुदैवानेच दुकानाला गेलेले कुटुंबप्रमुख भीमाप्पा खनगावी आणि कामानिमित्त बेळगावला गेलेला देवराज खनगावी या दुर्घटनेतून बचावले. यावेळी आपल्या कुटुंबाच्या झालेल्या वाताहतीबद्दल सांगताना भीमाप्पा याना अश्रू अनावर झाले.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी बडालअंकलगीला भेट देऊन दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांचे संवतन केले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई याना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती घेतली. दुर्घटनेतील बळींना त्यांनी प्रत्येकी ५ लाख रु भरपाई देण्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबाचे प्रमुख भीमाप्पा यांनाही फोन करून तुमच्या दुःखात सरकार सहभागी आहे. या घटनेचे मला दुःख आहे असे सांगून धीर दिला.

त्यानंतर रात्री उशिरा एकाच कुटुंबातील सहा जणांवर गावातील स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. कशाव्वा या मुलीवर स्वतंत्रपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश गगनाला भिडणारा होता. दरम्यान, या घटनेबद्दल पंतप्रधान मोदी यांनीही ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. मृतांना देव सदगती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. त्याशिवाय २ लाख रु भरपाईही घोषित केली आहे. काहीही असले तरी ऐन नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला सणाच्या आनंदात असणाऱ्या खनगावी-होळेप्पनावर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

Tags: