बेळगावात घरोघरी आणि मंदिरात आज घटस्थापना करून शारदीय नवरात्रौत्सवाला भक्तिपूर्वक प्रारंभ करण्यात आला. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी महालक्ष्मी, दुर्गादेवी मंदिरात अन सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात देवीची विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली.
होय, गणेशोत्सवानंतर सर्व भक्त ज्याची आतुरतेने प्रतिक्षा करतात त्या शारदीय नवरात्रौत्सवाला बेळगावात आज भक्तिपूर्वक प्रारंभ करण्यात आला.

घरोघरी आणि ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरात अन सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात आज घटस्थापना करून विविध वस्त्रालंकारांसह देवीची शैलपुत्री रूपात पूजा बांधण्यात आली. बेळगावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीच्या बसवण गल्लीतील मंदिरात नवरात्राच्या पहिल्या माळेला देवीची विशेष रूपात पूजा बांधून विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी मंदिरात भक्तांची दिवसभर रीघ लागली होती.
बेळगावातील बसवण गल्लीतील महालक्ष्मीचे मंदिर शहरातील पुरातन मंदिरापैकी एक आहे. येथे नवरात्रात रोज ९ दिवस महालक्ष्मीची विविध रूपात पूजा बांधण्यात येते. केवळ बेळगाव शहरच नव्हे तर परिसरातील अनेक गावचे भक्त यानिमित्त येथे येऊन देवीचे दर्शन घेतात. कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षे मंदिरात नवरात्र साधेपणाने साजरा करण्यात आला. कोणतेही वेगळे कार्यक्रम करण्यात आले नाहीत. आज नवरात्राच्या पहिल्या दिवशी कोरोनाच्या संकटातून संपूर्ण जगाची सुटका कर, समाजात शांतता नांदू दे अशी प्रार्थना मंदिराचे पुजारी राजशेखर बडिगेर यांनी केली.
दरम्यान, नवरात्रीच्या पहिल्या माळेनिमित्त महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात आज दिवसभर भक्तांची रीघ लागली होती.


Recent Comments