कोणाला खुश करण्यासाठी काहीही बरळण्याला काहीही अर्थ नाही. सिद्दरामय्या, कुमारस्वामी हे दोघेही मोठे नेते आहेत. त्यांनी इतरांपुढे आदर्श ठेवला पाहिजे. सवंग लोकप्रियतेसाठी, प्रसिद्धीसाठी काहीही विधाने करत राहू नयेत असे जलसंसाधनमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल कुमारस्वामी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नावर बुधवारी बेळगावात प्रतिक्रिया देताना मंत्री कारजोळ बोलत होते. ते म्हणाले, संघाच्या ध्येय-धोरणांविषयी माहिती नसणारे लोक काहीही बोलत सुटले आहेत. संघ भारत माता की जय म्हणून संपूर्ण देश एक असल्याचा संदेश देतो. युवकांमध्ये देशप्रेम निर्माण करून आपली संस्कृती आणि राष्ट्राभिमानाची बीजे रोवतो. संघाच्या ‘केशव कृपा’मध्ये कोणकोणत्या जाती-पतीचे लोक आहेत हे कोणालाही माहित नाही. तेथे कोणतीही जात-पात, धर्म-पंथ, गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही. देशासाठी त्याग करणारी ती संस्था आहे असे संघाचे समर्थन कारजोळ यांनी केले. त्याचप्रमाणे केवळ व्होट बँकेसाठी असे आरोप, विधाने करणे शोभत नाही असा टोला त्यांनी हाणला.
म्हादई प्रकल्पासंदर्भात मंत्री कारजोळ म्हणाले, १३.४ टीएमसी पाणी आमच्या वाट्याला आले आहे. यापैकी ५ टीएमसी पाणी पिण्यासाठी वापरले जाते, तर ८ टीएमसी पाणी वीज उत्पादनासाठी नदीत सोडले जाते. यासाठी २०१५मध्ये पर्यावरण खात्याकडून आम्हाला मंजुरी मिळाली आहे. ती अंतिम गृहीत धरावी अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. मात्र यावर गोवा आणि महाराष्ट्राने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. आम्हीही अर्ज केला आहे. आमच्या वाट्याचे पाणी वापरण्यासाठी योजना तयार करत आहोत. ती न्यायालयाला सादर केल्याच्या तिसऱ्या दिवसापासून कामाला प्रारंभ करू असे सांगितले.
‘मुंबई-कर्नाटक’ प्रदेशाचे ‘कित्तूर-कर्नाटक’ असे नामकरण करण्याबाबत साधक-बाधक विचार करून निर्णय घ्यावा लागेल. प्रत्येक जिल्ह्यानेच आपापली मागणी पुढे रेटली तर अवघड होईल. त्यामुळे पाहू असे उत्तर मंत्री कारजोळ यांनी दिले. १२ व्या शतकात बसवण्णा यांनी केलेल्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर ‘हैदराबाद-कर्नाटक’ प्रदेशाचे ‘कल्याण कर्नाटक’ असे नामकरण केले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगावात कर्नाटक राज्योत्सव साजरा करण्याबाबत बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे सण-उत्सव साजरे करणे बंद केले आहे. सीमाभागात बहुभाषक लोक राहतात. त्यामुळे तेथे सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. अन्य भाषकांनी कन्नडकडे आत्कृष्ट व्हावे असे काही करण्याची गरज आहे. भावनात्मक संबंध दृढ झाले पाहिजेत. त्यामुळे येथे आगळ्या पद्धतीने राज्योत्सव साजरा करण्यात येणार आहे असे मंत्री कारजोळ यांनी सांगितले.


Recent Comments