Belagavi

लखीमपूर खेरची घटना जालियनवाला बाग हत्याकांडासारखीच भयानक : विनय नावलगट्टी

Share

 कोणत्याही छोट्याछोट्या गोष्टींवर ट्विट करणारे, लाईव्ह देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या समस्यांवर मात्र चुप्प आहेत. हे आमच्या देशाचे दुर्दैव आहे अशी खंत बेळगाव ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी व्यक्त केली.

बेळगावात मंगळवारी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विनय नावलगट्टी म्हणाले, गेल्या अनेक महिन्यांपासून आमचे शेतकरी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी देशभरात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनावर मोदी आजवर एक चकार शब्दही बोललेले नाहीत. उत्तरपदेशातील लखीमपूर खेर येथे शेतकऱ्यांवर वाहन अंगावर घालून केलेला हल्ला हा ब्रिटिशांच्या जालियनवाला बाग हत्याकांडासारखाच भयानक आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर मागून येऊन जीप अंगावर घालून चिरडून मारले जाते म्हणजे हे किती खालच्या पातळीला पोहोचले आहेत हे दिसून येते. कोणत्या पद्धतीने ते देश चालवत आहेत याचा विचार करण्याची वेळ आली आहे असे नावलगट्टी यांनी सांगितले.

नावलगट्टी पुढे म्हणाले, जनतेने आपल्या मागण्यांची पूर्तता करण्याचा आग्रह धरणे चुकीचे मुळीच नाही. देशाचे प्रमुख या नात्याने तुमच्याकडे येऊन कोणी काही मागणी करेल, कोणी काही प्रश्न करेल तर कोणी विरोध करेल. पण अशांना चिरडणे, मारणे हे पाहता देशाची परिस्थिती भविष्यात काय होईल याबाबत जनतेत दहशत पसरली आहे. आम्हाला तर ही घटना जालियनवाला बाग हत्याकांडासारखी वाटते अशी टीका केली.

यानंतर महानगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजू सेठ म्हणाले, अदानी, अंबानींसारख्याना मदत करण्यासाठी भाजप सरकार जाचक कायदे आणत आहे. हे कायदे मागे घेण्याची मागणी सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे. या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर जीप घालून चिरडून त्यांची हत्या केली जाते. हे पाहता देशात नेमके चालले तरी काय आहे हे समजेनासे झाले आहे. आमच्या नेत्या प्रियांका गांधी याना अटक केली. हे सगळे निवडणूक जवळ आली म्हणून करताय की काय? काँग्रेस आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात तुमचे माजी आ. संजय पाटील अवमानास्पद वक्तव्य करतात. हीच तुमची संस्कृती आहे का? असा सवाल राजू सेठ यांनी भाजप नेत्यांना केला.

 

 

Tags: