Belagavi

अभ्यास पूर्ण कर, शाळेला जा म्हटल्याने अजाण बालकाने संपविले जीवन

Share

आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल घडवावे अशीच सगळ्या मातापित्याची इच्छा असते. परंतु केवळ गृहपाठ पूर्ण करून शाळेला जा असे सांगितल्यावरून अवघ्या १३ वर्षाच्या कोवळ्या बालकाने गळफास घेत आईवडिलांना, कुटुंबियांना दुःखाच्या खाईत लोटून दिल्याची घटना बेळगावात घडली आहे.

कोरोनाचा संसर्ग सध्या थोडा कमी झालाय. पण त्याची भीती लोकांच्या मनात अजून घर करून आहे. त्यामुळे सरकारने टप्प्याटप्प्यात शाळा सुरु केल्या आहेत. त्यामुळे आपला मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये, इतर मुलांप्रमाणेच शिकून सवरून मोठे व्हावे अशी आशा ठेवलेल्या या पित्याचे स्वप्न भंगले आहे. होय, बेळगावातील कसाई गल्लीतील सालेखान नामक व्यक्ती टेलरिंगचा व्यवसाय करून संसार चालवतात. त्यांना ३ मुले आहेत. त्यापैकी मोठा मुलगा शाहिद याने अजाण वयातच आपले जीवन संपवले आहे. तो सहावीच्या वर्गात शिकत होता. केवळ शाळा सुरु झाल्या आहेत, होमवर्क पूर्ण करून शाळेला जा असे सांगितल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

अजून जगही न पाहिलेल्या अवघ्या १३ वर्षांच्या शाहिदच्या आत्महत्येचे वृत्त ऐकताच त्याच्या पालकांनी एकच आक्रोश केला. अश्रूंना वाट मोकळी करून देत मुलाच्या आठवणीने धाय मोकलून त्यांना रडताना पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले. मार्केट सीपीआय मल्लिकार्जुन तुळसीगेरी आणि पीएसआय विठ्ठल हवनूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या संदर्भात ‘आपली मराठी’ला माहिती देताना मृत बालक शाहिदचे वडील सालेखान याना अश्रू अनावर झाले. कालच त्याच्या शिक्षकांना भेटून मुलाला उद्यापासून शाळेला पाठवतो असे सांगितले होते. ऑनलाइनवर दिलेला होमवर्क पूर्ण करून आजपासून शाळेला जा, नाहीतर तुला होस्टेलला ठेवतो एवढेच म्हटले, ते पोराने जीवाला लावून घेतले असे सांगताना सालेखान यांचा कंठ दाटून आला होता.

समाजसेवेब बाबुलाल बागवान याबाबत म्हणाले, अशी दुर्दैवी घटना कोणाच्याही बाबतीत घडू नये. मुलाने असे गळफास घेऊन जीवन संपविल्याचे केवळ सालेखान कुटुंबीयांनाच नव्हे तर या भागातील सगळ्या लोकांना मोठे दुःख झाले आहे. बाईट

दरम्यान, शाहिदच्या मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळाला पाठवून दिला. मूल गमावलेल्या माता-पित्यांचा आणि कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. काहीही असले तरी मुलांनी अजाण वयातच आत्महत्येचा मार्ग पत्करला तर आई-वडिलांनी तर काय करायचे? मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आई-वडिलांनी पाहणे चुकीचे आहे का? शाळेला जा, अभ्यास कर असे मुलांना त्यांनी सांगणे चुकीचे आहे का असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत हे मात्र खरे !

क्राईम ब्युरो, आपली मराठी बेळगाव.

 

Tags: