अन्नातून विषबाधा झाल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बेळगाव तालुक्यातील हुदली येथे घडली.

होय, हुदली गावात मायलेकाचं अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली आहे. पार्वती मळगली वय ५३ असे या घटनेतील आईचे तर सोमनिंगय्या मळगली वय २८ असे मुलाचे नाव आहे. रविवारी दिवसभर शेतातील काम संपवून ते सायंकाळी घरी आले होते. त्यानंतर त्यांनी भजी बनवून खाल्ली. त्यानंतर या मायलेकांना उलटी-जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ते तीव्र अत्यवस्थ झाले. शेजारच्यांनी त्यांना स्थानिक इस्पितळात दाखल केले. मात्र त्यांची तब्येत आणखी खालावल्याने त्यांना बेळगावातील जिल्हा बीम्स इस्पितळात दाखल करताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला. सोमवारी मृतदेहांच्या उत्तरीय तपासणीनंतर या मायलेकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मारिहाळ पोलीस उत्तरीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. तथापि अन्नातून विषबाधा झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
Recent Comments