कणबर्गी नव्या वसाहत योजनेला सरकारची मंजुरी मिळूनही बेळगाव नगरविकास प्राधिकरण वसाहतीला मंजुरी देईना झाले आहे. येत्या १ नोव्हेंबरच्या आत योजनेतील भूखंडांचे वाटप केले नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे.

बेळगावात सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना आपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील यासंदर्भात म्हणाले, बेळगाव शहर वेगाने वाढत आहे. मात्र गेल्या १५ वर्षांत नवी वसाहत योजना ‘बुडा’ने आखलेली नाही. विविध जिल्ह्यातील लोक नोकरी-व्यवसायानिमित्त बेळगावात येऊन स्थायिक होत आहेत. त्यांना घरे बांधून राहण्यासाठी जागा घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. कणबर्गी निवासी वसाहत योजनेला सरकारने मंजुरी देऊनही बुडा मात्र या योजनेला मंजुरी देण्यास मागेपुढे पहात आहे अशी नाराजी व्यक्त केली.
बुडामध्ये ६१ योजना मंजुरीचे आदेश आहेत. मात्र ते केवळ कागदावरच उरले आहेत. नव्या भूखंडांची बुडाकडे हजारो अर्ज आले आहेत. ते निकालात काढण्याची इच्छाशक्ती स्थानिक आमदारांनी दाखवली पाहिजे. बेळगाव शहरातील मोठ्या प्रमाणात जमिनीचे बुडाने संपादन केले आहे. तेथे लोकांच्या सोयीसाठी नागरी वसाहत निर्माण करण्याची जबाबदारी बुडाची आहे. त्यामुळे बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी, आ. सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, अनिल बेनके अभय पाटील यांनी यात लक्ष घालून लवकर निर्णय घेऊन पात्र लाभार्थीना भूखंड मंजूर केले पाहिजेत. अन्यथा १ नोव्हेंबरपासून ही योजना भूखंड वाटून अमलात न आणल्यास आम आदमी पक्षातर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विजय पाटील यांनी दिला.
यावेळी आप नेते अनिस सौदागर, अब्दुल शेख, शंकर हेगडे, आनंद कोलारकोप्प आदी उपस्थित होते. त्यानंतर आप नेत्यांनी बुडा कार्यालय गाठून अध्यक्ष घुळाप्पा होसमनी याना मागण्यांचे निवेदन दिले.


Recent Comments