आगामी सर्व निवडणूक लढवून स्वच्छ प्रशासन देण्याचे उद्दिष्ठ आम आदमी पक्षाने ठेवले आहे अशी माहिती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील यांनी खानापूर येथे दिली.

खानापुरातील शिवस्मारकात पत्रकार परिषदेत बोलताना विजय पाटील म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा कर्नाटभरात विस्तार करण्यात येणार आहे. खानापूर तालुका शाखेची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे. सत्तेतून पैसे आणि पैशातून सत्ता मिळवणे हे आजच्या राजकारणाचे सूत्र झाले आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार आणि सामान्य जनता विकासापासून वंचित रहात आहे. सामान्य माणसाला न्याय मिळायचा असेल तर त्यानेच राजकारणात आले पाहिजे.
खानापूर तालुक्यातील शोषित आणि वंचित जनतेला धोरण ठरविणे आणि निर्णय घेणे या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवून आम आदमी पार्टी तालुक्यात कार्यरत राहणार आहे. त्यामुळेच तालुक्यातील सर्व निवडणूक लढविण्यावर पक्षाचा भर राहील असे त्यांनी सांगितले. यावेळी आप तालुकाध्यक्ष भैरू पाटील, शिवाजी गुंजीकर, अबिद अहमद शेख, इम्रान अत्तार, फिलिप रॉड्रिग्ज, विठ्ठल असोदे, मंजुनाथ बागेवाडी, कल्पना सावंत, गोपाळ गुरव, मोहन मुळीक आदी उपस्थित होते.


Recent Comments