प्रत्येकाला आपला, आपल्या मुलांचा, नातवंडांचा प्रत्येक नातेवाईकाचा तसेच मित्रमंडळींचा वाढदिवस लक्षात असतो. प्रत्येकाच्या जन्मतारखेची नोंद कुठे ना कुठे असतेच. परंतु समाजात अनेक अनाथ मुले आहेत ज्यांना आपण कधी जन्मलो याची माहितीच नाही. अशा मुलांच्या आयुष्यात चक्क एका दिव्यांग विद्यार्थ्याने आपला वाढदिवस साजरा करत एक आगळावेगळा उपक्रम केला आहे.

कागवाड तालुक्यातील शांती सागर दिगंबर जैन आश्रमात अनेक गरीब आणि अनाथ मुलांचा समावेश आहे. त्यांच्या भविष्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जैन समाजाचे नेते, जैन मुनी सेवा करत आहेत. गरीब आणि अनाथ मुलांचे रक्षण तसेच त्यांच्या शिक्षणासाठी या आश्रमाची स्थापना करण्यात आली आहे.

या आश्रमातील या सर्व मुलांसोबत वितराग संजय मुकुंद या दिव्यांग विद्यार्थ्याने आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत आपल्या दिव्यांगपणाचा किंचितही लवलेश न जाणवू देता आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरविला आहे. या आश्रमातील अनाथ मुलांची संख्या अधिक प्रमाणात आहे. या मुलांना वाढदिवस काय असतो आणि तो कधी साजरा केला जातो याची माहितीच नाही. या मुलांसोबत वितरागने आपला वाढदिवस साजरा करून नवा आदर्श दिला आहे.
आपला वाढदिवस या मुलांसोबत साजरा करणे म्हणजे ही आपल्या वाढदिवसाची भेट असल्याचे वितराग सांगतो. वितराग सोबत वाढदिवस साजरा करून या मुलांनाही आपण अनाथ असल्याचे भान राहिलेच नाही. अशा पद्धतीचे उपक्रम समाजात होणे गरजचे असून अशा उपक्रमांमुळे समाजात शांती आणि सलोखा राखला जातो, असे मत मुख्याध्यापक चेतन भरतेश नांद्रे यांनी व्यक्त केले
वितराग यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आश्रमचे व्यवस्थापक राजू नांद्रे यांनी आश्रमातील हत्तीवरून पुष्पवृष्टी केली.
यावेळी वितरागचे वडील संजय मुकुंद, आई नंदा मुकुंद, बहीण समृद्धी मुकुंद, आश्रमाचे व्यवस्थापक राजू नांद्रे, समाज सेवक अण्णा अरवाडे, भरतेश नांद्रे, नेमगौड मुकुंद, एम. ए. गणी, वृषभ चौगुला, पोपट नांद्रे, सुमंगला नांद्रे, शोभा नांद्रे, सुजाता पायगौड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments