Politics

सिध्दरामय्यांनी आरएसएसविरोधी बोलणे टाळावे : भाजप विजापूर जिल्हाध्यक्ष आर. एस. पाटील यांचा सल्ला

Share

 

भाजपचे विजापूर जिल्हाध्यक्ष आर. एस. पाटील यांनी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या आरएसएसची तुलना तालिबान्यांशी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

विजापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आर. एस. पाटील यांनी सिध्दरामय्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आर.एस.एस. संघटना ही देशभक्तांची संघटना असल्याचे सांगत सिध्दरामय्यांनी आरएसएस संदर्भात वक्तव्य करणे सोडावे, असा आग्रह केला. (फ्लो)

आर. एस. पाटील पुढे म्हणाले, माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी जलसंपदा गोविंद कारजोळ हे पापी मंत्री असल्याचे वक्तव्य केले होते. परंतु आपण या वक्तव्याचा निषेध करत असून विजापूर जिल्ह्यात जलसिंचन प्रकल्प होण्यासाठी भाजपाच जबाबदार आहे, असे सांगितले. गोविंद कारजोळ यांनी स्वतः या प्रकल्पासाठी काळजीने कार्य पार पाडले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे हा सिंचन प्रकल्प सुरु झाला आहे. काँग्रेस सरकारने अवैज्ञानिकतेचे कारण पुढे करत हा प्रकल्प रद्द केला, ही गोष्ट एम. बी. पाटील यांनी विसरू नये, असा टोलाही आर. एस. पाटील यांनी लगावला आहे.

येत्या ६ ऑक्टोबर रोजी भाजप राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील हे विजापूर दौऱ्यावर येत असून याठिकाणी होणाऱ्या मागासवर्ग राज्य कार्यकारिणीत ते सहभाग घेणार आहेत. सिंदगी पोटनिवडणुकीसाठी लवकरात लवकर उमेदवार जाहीर करण्यात येईल, असा विश्वास देखील आर. एस. पाटील यांनी व्यक्त केला. ५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील अनेक नेते भाजपमध्ये सामील होणार आहेत, अशी माहिती आर. एस. पाटील यांनी दिली.

पत्रकार परिषदेस आमदार सोमनगौड सासनूर, अरुण शहापूर, माजी मंत्री आण्णासाहेब पट्टणशेट्टी, माजी आमदार रमेश भुसनूर, विजय जोशी आणि इतर उपस्थित होते.

Tags: