विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अर्ज केला आहे. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्याकडे बिल्डिंग फंडासाठी १ लाख रु देऊन उमेदवारीसाठी अर्ज केल्याची माहिती बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली.

शुक्रवारी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, याआधी लोकसभा निवडणूक, पोटनिवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाच्या भूमिकेनुसार, शिस्तीच्या नियमांचे पालन केले आहे. पक्षाने उमेदवारी दिलेल्यांच्या विजयासाठी काम केले. आता विधान परिषदेसाठी प्रदेशाध्यक्ष शिवकुमार, विधिमंडळ गटनेते सिद्दरामय्या यांच्याकडे तिकीट देण्याची मागणी केली आहे. ‘तुम्ही तरुण आहेत, सर्वांशी चर्चा करून संधी देऊ’ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. याबाबत अंतिम निर्णय राज्याचे पक्षश्रेष्ठी घेतील. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी यांनीही विधान परिषदेची इच्छा बोलून दाखवली आहे. आणखी किती इच्छुकांनी अर्ज केले आहेत हे माहित नाही असे चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.
आमच्याकडे सहकारी संस्था, साखर कारखाना आहे. त्यामुळे ४ तालुक्यातील शेतकऱ्यांशी चांगला संपर्क आहे. त्यातील अनेकजण ग्रापं, पालिका सदस्य आहेत. आमचे व त्यांचे चांगले संबंध आहेत. आमच्यावर त्यांचे प्रेम असल्याने तुम्ही निवडणुकीला उभे रहा अशी गळ घालून त्यांनी सर्व तयारीही केली आहे. मी काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. हायकमांड, राज्य आणि जिल्हास्तरीय नेत्यांनी आशीर्वाद दिल्यास विधान परिषद निवडणूक लढवेन असे चन्नराज हट्टीहोळी यांनी यावेळी सांगितले.
आम्ही ज्या-ज्या ठिकाणी भेट दिले तेथे विध्यमान विधान परिषद सदस्यांबाबत नाराजी दिसून आली. निवडून आल्यानंतर ते एकदाही फिरकले नाहीत, आमची विचारपूस केली नाही, साधे पत्रही दिले नाही अशा तक्रारी ग्रापं सदस्य, अध्यक्ष करत आहेत. मला संधी मिळाल्यास हे चित्र बदलून टाकेन असे आश्वासन त्यांना दिले आहे. निवडून आल्यावर साडेपाच वर्षे घरात बसून राहिलेले विद्यमान विधान परिषद सदस्य आता निवडणूक आल्याने ऍक्टिव्ह झाले आहेत असा आरोपही चन्नराज हट्टीहोळी यांनी केला.
एकंदर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांच्या पाठोपाठ आता चन्नराज हट्टीहोळी यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर आता काँग्रेस हायकमांड कोणाला उमेदवारी देणार याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.


Recent Comments