Belagavi

ह. भ. प. ताजोद्दीन महाराज शेख कीर्तन करतानाच कालवश

Share

जातिधर्मांच्या भिंतींपलीकडे जाऊन मानवधर्माची शिकवण देणारे प्रख्यात कीर्तनकार . . . ताजोद्दीन महाराज शेख यांचे, त्यांच्याच इच्छेनुसारच कीर्तन करतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले.

२ वर्षांपूर्वीच साक्री तालुक्यातीलच प्रतापपूर येथे कीर्तन सादर करताना, मला कीर्तन सादर करतानाच मरण आले तर, माझ्यासारखा भाग्यवान मीच असेन’ असे महाराजांनी म्हटले होते. तोच योगायोग त्यांच्याबाबतीत घडून आला. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी गावात सामान्य मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या ताजोद्दीन महाराजांनी मित्रांच्या संगतीने भजन-भारुडाच्या कार्यक्रमांना जात ही कला आत्मसात केली. सातवीपर्यंत शिकल्यावर त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग करून भगवे कपडे घालून वारकरी संप्रदायाला वाहून घेतले. काही दिवसांतच ते भजन-भारुडात पारंगत झाले आणि कीर्तन-भजन करू लागले. मुस्लिम असल्याने त्यांनी वारकरी संप्रदाय स्वीकारणे अनेकांना रुचले नाही. त्यामुळे पंचक्रोशीतून त्यांना मोठा विरोधही झाला. परंतु त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. वयाच्या २४व्या वर्षी त्यांनी बोधलापुरी गावात आपले पहिले जाहीर कीर्तन केले. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वधर्म समभाव मानणारा समाज तयार करायचे आपले स्वप्न आहे असे ते नेहमी सांगत. गावातच त्यांनी छोटासा मठ उभारून तेथे साईबाबांची मूर्ती प्रतिष्ठापित केली होती. राज्यभर त्यांचे कीर्तनाचे कार्यक्रम सतत सुरु असायचे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या विचारांचा त्यांनी सतत कीर्तनाच्या माध्यमातून प्रसार-प्रचार केला. संस्कृतवर प्रभुत्व असणाऱ्या ताजोद्दीन महाराजांनी मराठी वाङ्मय आणि संत साहित्यावर पीएचडी केली होती.

काय सांगू पंढरीनाथा, माझी चिंता तुज सर्व आहे

सोमवारी रात्री धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जामदे येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सातव्या दिवशीचे कीर्तन सादर करताना ‘काय सांगू पंढरीनाथा, माझी चिंता तुज सर्व आहे’ हा अभंग गात असतानाच त्यांना हृदयघाताचा तीव्र झटका आला. त्यावेळी ते मंचावर खाली बसले आणि भिलाजी बारीक शिंदे या वारकऱ्याच्या मांडीवर आपला देह ठेवत अखेरचा श्वास घेतला. त्यांना तातडीने आयोजकांनी नंदुरबारमधील शनिमंडाळ येथील डॉक्टरांकडे नेले. त्यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

 

Tags: