Savadatti

सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवीच्या मंदिराची दारे खुली

Share

 कोरोनामुळे गेले १८ महिने बंद असलेल्या कर्नाटकमहाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवीच्या मंदिराची दारे भाविकांसाठी आजपासून खुली करण्यात आली आहेत.

होय, सौंदत्तीमधील श्री रेणुका यल्लम्मा देवीचे मंदिर कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. रोज हजारो भक्त या मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतात. खास करून नवरात्रात देवीला तेल वाहण्यासाठी, दर्शनासाठी रोज लाखो भाविक येथे येतात. परंतु कोरोना महामारीमुळे गेले १८ महिने हे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांच्या नाराजी होती. दरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोरोना संसर्ग कमी झाल्याने बेळगाव जिल्हा प्रशासनाने सरकारच्या आदेशानुसार आजपासून भाविकांसाठी मंदिराची दारे खुली केली. मंगळवारी रेणुका देवस्थान मंडळाचे अध्यक्ष सौंदत्तीचे आ. आनंद मामनी, जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, देवस्थान मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी देवीचे दर्शन घेतले. १८ महिन्यानंतर रेणुका देवीचे मंदिर दर्शनास खुले झाल्याने मंदिर आकर्षक फुलांच्या माळांनी सजविण्यात आले आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने काही अटी व शर्ती घालून मंदिर दर्शनासाठी खुले केले आहे. लोकांची गर्दी होणार नाही, कोणतीही जत्रा भरवली जाणार नाही अशा अटी घालण्यात आल्या आहेत. आज सकाळी ८ वाजल्यापासून मंदिर देवीच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांना सामाजिक अंतर राखून दर्शन घेण्याची व्यवस्था देवस्थान प्रशासनाने केली आहे असे देवस्थान मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी सांगितले ,

एकंदर तब्बल १८ महिन्याच्या कालावधीनंतर मंदिर खुले केल्याने रेणुका-यल्लम्मा देवीच्या दर्शनास आतुर असलेल्या भक्तांची प्रतीक्षा आता संपली आहे. सर्वानी कोरोना मार्गसूचीचे पालन करत देवीचे दर्शन घेऊन सुरक्षित रहावे हीच आमची यानिमित्ताने अपेक्षा !

 

Tags: