Belagavi

सर्व्हर डाउनचा मंत्री मुनेनकोप्प यांना फटका !

Share

सर्व्हर डाउन हा आज परवलीचा शब्द बनला आहे. सरकारी कार्यालयात त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोच. पण मंत्र्यांनाही त्याचा अनुभव आल्याची घटना मंगळवारी हिरेबागेवाडी टोल नाक्यावर घडली.

होय, कोणत्याही सरकारी, निमसरकारी कार्यालयात कामांसाठी गेलेल्या नागरिकांना सर्व्हर डाऊन आहे असे सांगितल्याचा अनुभव येतो. पण कधीतरी का असेना त्याचा फटका मंत्र्यांना बसला तर? अशीच घटना मंगळवारी सकाळी बेळगावजवळील हिरेबागेवाडी टोल नाक्यावर घडली. वस्त्रोद्योग व साखर मंत्री शंकर पाटील-मुनेनकोप्प एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मंगळवारी सकाळी धारवाडहुन बेळगावला येत होते. त्यांची कार हिरेबागेवाडी टोल नाक्याजवळ येताच वाहनांची भली मोठी रांग लागल्याचे दिसून आले. टोल नाक्यावरील टोल आकारणी केंद्रातील कॉम्प्युटरचा सर्व्हर डाउन झाल्याने टोल आकारणी खोळंबली होती. त्यामुळे १ किमीहून अधिक लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टोल नाक्यावरील व्हीआयपी वाहनांच्या पॅसेजवरही दुसरी वाहने थांबल्याने मंत्र्यांचे वाहन जायला जागा नव्हती. त्यामुळे मंत्री मुनेनकोप्प टोल नाक्यावरील ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडले. टोल नाका कर्मचाऱ्यांना माहिती देऊन व्हीआयपी रस्ता मोकळा करेपर्यंत सुमारे १५-२० मिनिटे त्यांना ताटकळत रहावे लागले. त्यानंतर ते बेळगावकडे रवाना झाले.

 

 

 

Tags: