Bailahongala

सोयाबीन दर घसरणीच्या विरोधार्थ बैलहोंगलमध्ये जेडीएसची निदर्शने

Share

सोयाबीनचे दर जलद गतीने घसरत चालले आहेत. याविरोधात आज बैलहोंगल येथे राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधार्थ निषेध करत जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर मूडलगी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

बैलहोंगल शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून निषेध मोर्चा काढण्यात आला. जेडीएसचे बैलहोंगल जिल्हाध्यक्ष शंकर मूडलगी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. सोयाबीनला क्विंटलमागे ९ हजार रुपये दर होता. तो दर आता ५ हजार ३०० रुपयांवर घसरला आहे. सोयाबीनच्या घटत्या दरामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनाशी सरकार खेळात असल्याचा आरोप करत, सरकार विरोधात घोषणा देत निदर्शने करण्यात आली.यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जेडीएस जिल्हाध्यक्ष शंकर मूडलगी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी सोयाबीनचा दर प्रति क्विंटल १५०० रुपयांनी घसरला. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना दिलेली हि अनमोल भेट आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनला प्रति क्विंटल ९ हजार दराची मागणी केली आहे. सरकारने दर निश्चित न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मूडलगी यांनी दिला.

यावेळी आणखी एक आंदोलनकर्त्याने असे सांगितले कि केंद्र आणि राज्य सरकार निरंतरपणे शेतकरी विरोधी धोरण अवलंबत आहे. देशातील शेतकरी संकटात असताना पंतप्रधान ८४०० कोटी रुपये खर्चून अमेरिकेला जातात, हे निंदनीय असल्याचे मत या आंदोलनकर्त्याने व्यक्त केले.

या निषेध मोर्चात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेत सोयाबीनला प्रतिक्विंटल १० हजार रुपये दर निश्चित करावा, अशी मागणी करत केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

Tags: