बेळगाव लोकसभा मतदारसंघातील अजिंक्य सरदार, सध्या सरळ स्वभावाची सज्जन मूर्ती असलेल्या दिवंगत सुरेश अंगडी याना आपल्यातून जाऊन आज बरोबर १ वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र आपण केलेल्या कार्यातून ते अजरामर झाले. अशा लोकनायकाच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा हा रिपोर्ट .

होय, सुरेश अंगडी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे एक शिस्तबद्ध एकनिष्ठ शिपाई. बेळगाव लोकसभा मतदार संघातून सतत ४ वेळा निवडून येऊन अजिंक्य ठरलेला सरदार. त्यांची कार्यक्षमता, काम करण्याची इच्छाशक्ती पाहून २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना रेल्वे राज्यमंत्री पद बहाल केले. मंत्रिपद स्वीकारल्याबरोबर कार्यालयात बसून राहण्याऐवजी सुरेश अंगडी यांनी विकासाला वाहून घेतले. हुबळी-धारवाड, बेंगळूरपर्यंत मर्यादित राहिलेल्या रेल्वे योजनांचा जन्मभूमी बेळगावपर्यंत विस्तार केला. कर्नाटकातून आजवर अनेक रेल्वेमंत्री झाले. परंतु जॉर्ज फर्नांडिस यांच्यानंतर कर्नाटकात सर्वाधिक रेल्वेयोजना राबविण्याचा मान सुरेश अंगडी यांनाच जातो.
मिरज-लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण त्यांनी तातडीने करवून घेतले. बेळगाव-कित्तूर-धारवाड थेट रेल्वे मार्गाचे त्यांनी जातीनिशी लक्ष घालून पूर्ण केलेले काम अविस्मरणीय आहे. बेळगाव, हुबळी रेल्वेमार्गाचे आधुनिकीकरण करण्यालाही त्यांनीच चालना दिली. आरंभापासूनच बेंगळूर उपनगरी रेल्वे त्वरित पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारकडून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्याशिवाय बेंगळूरच्या मेट्रो योजनेला रेल्वे खात्याकडून बराच मोठा निधी मिळवून दिला. उत्तर कर्नाटक आणि करावळी प्रदेशाला जोडण्याचे शतकाहून अधिक काळचे स्वप्न बनून राहिलेली हुबळी-अंकोला रेल्वेमार्ग योजना पर्यावरणाच्या कारणास्तव असून राहिली. मात्र सुरेश अंगडी यांनी या योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी परिश्रम घेतले. रेल्वेसेवेचा दर्जा वाढवून कुंदानगरी बेळगावला रेल्वेसंचार सेवेने जोडले. बेळगावातील जुन्या काळातील रेल्वे स्थानकाचा आधुनिक पद्धतीने कायापालट करण्याचे काम त्यांच्या हयातीतच सुरु झाले. अशीच आणखी स्वप्नेही त्यांनी पाहिली होती. महामारी कोविडमुळे दिल्लीतील एम्स इस्पितळात २३ सप्टेंबर २०२० रोजी सुरेश अंगडी यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या चनक जाण्याने केवळ बेळगाव जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्यालाच धक्का बसला.
एक खराखुरा जननायक, राजकारण्यांना हवा असाच स्वभाव त्यांचा होता. सर्वांचे हसतमुख चेहऱ्याने स्वागत करून क्षेमकुशल विचारून, समस्या ऐकून, त्या सोडवून एखाद्याला दिलासा देणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य. त्यांची कोणाशी तुलना करायची तर ती त्यांच्याशीच करावी लागेल. सध्या त्यांच्या रिक्त जागी त्यांच्या धर्मपत्नी मंगल अंगडी यांनी लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी होऊन खासदार म्हणून सेवा बजावत आहेत. मंगल अंगडी याना त्यांच्या कन्या स्पुर्ती पाटील, श्रद्धा शेट्टर याही साथ देत आहेत. सुरेश अंगडी यांनी पाहिलेले स्वप्न त्यांच्या धर्मपत्नी आणि कन्यांनी पूर्ण करावे. देव सुरेश अंगडी याना चिरशांती देवो. एकंदर साधकाला मरण नाही अशा महात्म्यांच्या वाणीप्रमाणे मृत्यूनंतरही अमर राहिलेल्या एकमेवाद्वितीय राजकारणी सुरेश अंगडी याना हॅट्स अप म्हणावेच लागेल !


Recent Comments