कोरोना लॉकडाउन काळात बांधकाम कामगारांना देण्यासाठी सरकारने दिलेली फूड किट्स बेळगाव दक्षिण मतदारसंघातील भाजप नगरसेवकाच्या नातेवाईकाने बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याच्या घटनेने आता राजकीय वळण घेतले आहे. शहापूर पोलिसांनी हे प्रकरण जबरदस्तीने मिटविल्याचा आरोप ऐकू येत आहे.

सरकारने कोरोना लॉकडाउन काळात बांधकाम कामगारांना देण्यासाठी अन्नसामग्री असलेली फूडकीट्स मंजूर केली होती. ही फूडकीट्स बेळगाव दक्षिण मतदारसंघातील भाजप नगरसेवकाच्या एका नातेवाईकाने साई भवनमध्ये बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याचे प्रकरण एका स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्याने उघडकीस आणले. याचा व्हिडिओ तयार केलेल्या त्या काँग्रेस कार्यकर्त्याचा मोबाईल भाजप कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने हिसकावून घेत त्याला अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ केली होती. एवढेच नाही तर स्थानिक भाजप नेत्याने पोलिसांवर दबाव आणून जबरदस्तीने या प्रकरणी तोडगा काढला होता. या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि न्याय द्यावा अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सायंकाळी शहापूर पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. यावेळी काँग्रेस नेते आर. पी. पाटील आणि निदर्शक काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार शाब्दिक चकमक झाली.
बांधकाम कामगारांना द्यावयाची फूडकीट्स भाजप नगरसेवक-कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे साठवून ठेवली आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी एका महिला काँग्रेस कार्यकर्तीने केली.
एकंदर, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी रविवारी शहापूर पोलीस ठाण्यासमोर फूडकीट्सच्या बेकायदा साठवणुकीवरून जोरदार हंगाम केला. शहापूर पोलिसांनी आता या प्रकरणाची न्यायोचित चौकशी करून दोषींवर कारवाई करणे गरजेचे आहे.


Recent Comments