EVENT

कल्याण कर्नाटकाच्या विकासासाठी कार्यक्रम : मुख्यमंत्री

Share

सरासरी दरडोई उत्पन्न मोजण्याचे निकष जागतिक बँकेने बदलले आहेत. सुखासमाधानात नांदणारी किती कुटुंबे आहेत यावर आता विकासाचा जीडीपी निर्देशांक मोजण्यात येतो. या निकषावर कल्याण कर्नाटकाच्या विकासासाठी कार्यक्रम राबवण्यात येतील असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

कलबुर्गी येथे शुक्रवारी कल्याण कर्नाटक मुक्तिदिन कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आजचा दिवस कल्याण कर्नाटकाचा स्थापनदिन म्हटल्यासही वावगे ठरणार नाही. या प्रदेशाचा विकास आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा सगळ्या पातळ्यांवर व्हावा यासाठी आमचे नेते येडियुरप्पा यांनी त्याचे नाव कल्याण कर्नाटक असे ठेवले आहे. आज मी कोणत्याही नव्या विकासयोजनांची घोषणा करणार नाही. राबविण्यात येत असलेल्या योजना त्वरित पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. लोकांना उपयुक्त ठराव्यात अशा पाटबंधारे, वीजपुरवठा, उद्योग, रोजगार निर्मिती अशा योजना राबवण्यावर भर देण्यात येईल असे बोम्मई म्हणाले.

अपर कृष्णा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात कलबुर्गी, रायचूर, विजापूर, हुमनाबाद, जेवर्गी उपकालवा यासह अनेक कामे लवकर पूर्ण करण्यात येतील. कलबुर्गी देशातील एक प्रमुख शहर म्हणून उदयाला येत आहे. येथे टेक्स्टाईल पार्क, ज्युवेलरी पार्क स्थापण्याचे उद्योगमंत्र्यांचे स्वप्न आहे. त्याशिवाय ‘एक जिल्हा एक पीक’ ही केंद्राची योजना कल्याण कर्नाटकातील ६ जिल्ह्यांत राबविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

यादगिरी आणि रायचूर जिल्ह्यांत मुलांमध्ये कुपोषण आहे. महिलांचा आरोग्य व शैक्षणिक स्तर खालावलेला आहे. या समस्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. कल्याण कर्नाटकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तज्ज्ञ, जाणकारांशी चर्चा करून पावले उचलणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी उद्योगमंत्री मुरुगेश निराणी, मुनिरत्न, खा. उमेश जाधव आदी उपस्थित होते.

 

Tags: