Belagavi

फिल्मी स्टाईल थरारक पाठलाग अन ७ कोटींची सुपारी जप्त !

Share

 केंद्रीय जीएसटी आणि केंद्रीय अबकारी खात्याच्या पथकाने हुबळीनवलगुंद रस्त्यावर थरारक पाठलाग करून वे बिल अर्थात जीएसटी चुकवून नेली जाणारी कोटी रुपये किंमतीची सुपारी आणि ट्रक जप्त केले. फिल्मी स्टाईलने केलेल्या या कारवाईत अधिकाऱ्यांना मोठे घबाड हस्तगत करण्यात यश आले

होय, पारंपरिक खायच्या पानात, देवपूजेत आणि पानमसाल्यात वापरल्या जाणाऱ्या सुपारीवर ५% जीएसटी कर लावण्यात आला आहे. कर्नाटकाच्या मलनाड आणि किनारपट्टी भागात सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कर चुकवण्यासाठी सुपारीची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे समजल्यावरून केंद्रीय जीएसटी आणि केंद्रीय अबकारी खाते त्यावर बारीक नजर ठेवून होते. त्यातूनच खात्याला सुमारे ७ कोटी रुपये किंमतीच्या सुपारीची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याची निश्चित खबर मिळाली. त्यावरून सापळा रचून खात्याच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

प्राथमिक तपासात शिवमोग्गा येथे ही सुपारी खरेदी करून दिल्ली आणि अहमदाबादला पाठविण्यात येत होती असे निष्पन्न झाले आहे. जीएसटी चुकवून चोरट्या मार्गाने ती पाठविण्यात येत होती. सुपारी वाहतूक करणारी सर्व ७ वाहने मुद्देमालासह बेळगावच्या डीजीजीआय कार्यालयाने ताब्यात घेतली असून चौकशी करण्यात येत आहे. त्यातून जीएसटी चोरीची आणखी माहिती बाहेर पडण्याची आशा आहे. केंद्रीय जीएसटी खात्याचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य काटकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने थरारक पाठलाग करून ही धाडसी कारवाई केली. हे पथक हुबळीजवळ सुपारीवाहू ट्रकच्या प्रतीक्षेत थांबले होते. ट्रक चालकांनी आधी वेग कमी केला. मात्र नंतर अचानक वाहनांचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि विशेष पथकाने फिल्मी स्टाईल पाठलाग करून वाहने ताब्यात घेतली. राजीव हेगडे, रियाज बेळगावकर, एस. पी. नाईक, आबिदहुसेन नेसरगी, विश्वनाथ निडगुंदी या अधिकाऱ्यांनी या धाडसी कारवाईत भाग घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कारवाईबद्दल पथकाचे अभिनंदन केले आहे.

 

Tags: