केवळ गुटखा उधारी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून पानपट्टी चालकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना बेळगावातील वडगावमधील लक्ष्मीनगरात घडली. या घटनेने वडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

वडगाव परिसरात मंगळवारी रात्री ५ दिवसांच्या गणेशाच्या विसर्जनाची धामधूम सुरु होती. सगळेजण गणेश विसर्जनात, लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात मग्न होते. त्यावेळी लक्ष्मीनगरातील पानपट्टी चालक बाळकृष्ण शेट्टी याच्या दुकानात येऊन दत्तात्रय शिवानंद जत्तीनमठ याने गुटखा उधारी देण्याची मागणी केली. त्याला बाळकृष्ण याने नकार दिला. त्यामुळे बाळकृष्ण दुकान बंद करून जात असताना डबा धरून बसलेल्या दत्तात्रयने आपल्याकडील चाकूने भोसकून बाळकृष्णचा निर्घृण खून केला.
मृत पानपट्टी चालक बाळकृष्ण हा मूळचा उडपी जिल्ह्यातील कुंदापूर गावचा आहे. गेल्या २५ वर्षांपासून तो या परिसरात पानशॉप चालवून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तातडीने हालचाल करून आरोपी दत्तात्रयच्या मुसक्या आवळून चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, घटनेसंदर्भात बाळकृष्णचा नातेवाईक प्रभाकर शेट्टी यांनी प्रसारमाध्यमाना माहिती देताना सांगितले की, दत्तात्रय याने दारूच्या नशेत दुकानाकडे येऊन गुटखा उधारी देण्यासाठी किरकिर सुरु केली. त्याला नकार दिल्याने दत्तात्रय याने बाळकृष्णचा खून केला. यापूर्वीही अनेकदा दत्तात्रय याने बाळकृष्णला गुटखा व अन्य वस्तू उधारी देण्यासाठी वरचेवर त्रास दिला आहे. पोलिसांनी त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडू नये आणि कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली.


Recent Comments