Belagavi

जिल्ह्यात शुक्रवारी महालसीकरण शिबिर; ३ लाख लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट

Share

सर्वाना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सरकारतर्फे येत्या शुक्रवारी महालसीकरण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यात बेळगाव जिल्ह्यातील लाख लोकांना एकाच दिवशी लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली.

महालसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी बेळगावात बुधवारी जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्स संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात बेंगळूरनंतर बेळगाव जिल्ह्याला सर्वाधिक लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापूर्वी राबवलेल्या लसीकरण मोहिमेत बेळगाव जिल्ह्याने एकाच दिवशी एक लाखाहून अधिक नागरिकांना लस देऊन राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.

यावेळी ३ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यासाठी विशेष पथके नेमून सर्व तयारी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली. शहरी भागांत सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत लसीकरण अभियान राबवावे. तसेच ग्रामीण भागातही लसीकरणाची व्यवस्था करावी. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, समुदाय आरोग्य केंद्रे तसेच सर्व सरकारी इस्पितळांत शुक्रवारी १७ सप्टेंबरला लस देण्यात येईल. तसेच ग्रामीण आणि शहरी भागात वार्ड स्तरावर लसीकरण केंद्र स्थापन करून लोकांना लस देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीला जिप सीईओ दर्शन एच. व्ही., बेळगाव पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, एसी रवींद्र कर्लिंगन्नावर, जिल्हा नगरविकास कोशाचे योजना संचालक ईश्वर उल्लागड्डी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

Tags: