सुमारे २५–३० वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या बेळगावच्या बीम्स इस्पितळात आता सुधारणेचे पर्व सुरु झाले आहे. प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी बीम्सच्या प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून हा बदल घडून येतो आहे.

होय, बीम्स इस्पितळ जिल्ह्यातील रुग्णांसाठी आरोग्य संजीवनी ठरायला हवे होते. पण कोरोनाच्या पहिल्या लाटेत बीम्स इस्पितळातील अस्वछता, बेशिस्त आणि एकंदर भोंगळ कारभाराची लक्तरे उघड्यावर आली होती. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही बीम्स इस्पितळ समाज माध्यमांवर टीकेचे लक्ष्य ठरले होते. तेथील पाण्याचे दुर्भिक्ष्य, अस्वच्छता, अनागोंदी अशा एक ना अनेक कारणांवरून सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून अनेकांनी आपला संताप व्यक्त केला होता. त्याशिवाय सरकारही टीकेची झोड उठली होती.
त्यामुळे सावध होऊन तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांची बीम्सच्या प्रशासकपदी नियुक्ती केली होती. आपली नवी जबाबदारी एक आव्हान समजून बिस्वास यांनी दिवसरात्र बीम्स कार्यालयात बसून तेथील समस्यांची माहिती मिळवून टप्प्या-टप्प्याने बीम्सच्या एकंदर कामकाजात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्याशिवाय बीम्सच्या सुधारणेसाठी अनेक संघ-संस्थांकडून आर्थिक मदतीचा ओघही उपलब्ध करून दिला आहे. बाह्य कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना हटवून त्यांच्या जागी होम गार्ड्सची नियुक्ती करून बीम्स इस्पितळात शिस्त निर्माण केली आहे.
आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा समर्थपणे सामना करण्यासाठी विशेष कोविड वार्डची निर्मिती करण्यासह सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी उपचारांचाही सोय उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासोबतच बीम्सचे संचालक, वैद्यकीय अधीक्षक , डॉक्टर्स, कर्मचारी एकत्रितपणे परिश्रम घेत बीम्स इस्पितळाची सुधारणा घडवून आणत आहेत. त्यामुळे रुग्णांना तत्पर वैद्यकीय सेवा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.


Recent Comments