Belagavi

तिच्या जिद्दीला सलाम : ती केवळ उत्तीर्णच झाली नाही तर रँकही मिळवला

Share

घरच्या गरिबीशी कडवी टक्कर देत जिद्द न सोडता वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनीचा रविवारी बेळगावात सत्कार करून तिच्या जिद्दीला सलाम करण्यात आला.
होय, मुजामा तिचं नाव. घरी दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. तरीही चिकाटी न सोडता बीएएमएसचे शिक्षण पूर्ण करायचेच या जिद्दीने कधी चहा-बिस्किटांवर भागवून तर कधी उपाशी राहून तिने जिद्दीने बीएएमएस पूर्ण केले. बेळगावातील कणबर्गी रस्त्यावरील देसाई लॉनमध्ये रविवारी एका समारंभात तिचा सत्कार करून तिच्या जिद्दीला सलाम करण्यात आला. फ्लो मुजामा मूळची गुजरातची. बीएएमएस अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी तिने ऑनलाईन अर्ज केला होता. त्यावेळी तिला बेळगावच्या रुरल आयुर्वेद कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. गरिबीमुळे तिला जेवणाचीही भ्रांत होती.

एका घासाला महाग असलेल्या मुजामाने कधी चहा-बिस्किटांवर भागवले तर कधी उपाशी राहिली. तिची व्यथा ओळखून घरमालकाने आपल्या घरीच तिच्या जेवणाची सोय केली. तिच्याबाबत माहिती मिळाल्यावर काही स्वयंसेवी संस्थांनी आणि समाजसेवकांनी मुजामाच्या शिक्षणाची आणि जेवणाखाण्याची सोय केली.

परिस्थितीशी झगडत मुजामाने जिद्दीने बीएएमएस पूर्ण केले. ती केवळ उत्तीर्णच झाली नाही तर रँकही मिळवला. त्यामुळे बेळगावातील स्वयंसेवी संस्थांकडून तिचा सत्कार करून गौरविण्यात आले. सत्कारानंतर भावुक झालेली मुजामा म्हणाली, गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ माझ्यावर आली होती. मात्र स्वयंसेवी संस्थांनी आणि समाजसेवकांनी केलेल्या मदतीमुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकले. त्याबद्दल मी त्यांची सदैव आभारी राहीन.

खरेच. समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे हेच या घटनेवरून सिद्ध होते. या प्रसंगी समाजसेवक फैजुल्ला माडीवाले, जमीन हांचीनमणी, अफझल घिवाले, साजिद सैयद, जुबेर मूतवल्ली, अहद मुल्ला, सलीम माडीवाले, युनूस काकती आदी उपस्थित होते.
तिच्या जिद्दीला सलाम ! गरिबीशी झगडत केले बीएएमएस पूर्ण ती केवळ उत्तीर्णच झाली नाही तर रँकही मिळवला
गुजरातच्या मुजामाचा बेळगावात झाला सत्कार

Tags: