Vijayapura

काठ्या घेऊन उभ्या गावकऱ्यांना पाहून चोरट्यांची कार उलटली !

Share

बकरी चोरी करण्याच्या उद्देशाने ते आले होते, पण गावकरी लाठ्या घेऊन पाठ लागल्याने त्यांना चुकविण्याच्या नादात त्यांची कारच उलटली. ही फिल्मीस्टाईल घटना विजापूर जिल्ह्यातील मुकर्तीहाळ गावात घडली.

विजापूर जिल्ह्यातील तालिकोटे तालुक्यातील मुकर्तीहाळ गावात चोरट्यांची एक टोळी कार घेऊन बकरी चोरण्याच्या उद्देशाने आली होती. पण त्याची चाहूल लागल्याने एका मेंढपाळाने आरडाओरड केली. त्यामुळे चोरटे कारसह पळून जाऊ लागले. त्यांनी आपली कार डोनी नदीवरील पुलावर घातली. मात्र पावसामुळे नदी भरून पुलावर पाणी आल्याने त्यांनी कार मागे घेत ते परत मुकर्तीहाळ गावाकडे वळले.

मात्र तेथे गावकरी लाठ्या-काठ्या घेऊन उभे असल्याचे दिसल्यावर चालकाचे अवसान गळाले. या गडबडीत त्याचे कारवरील नियंत्रण सुटून कार उलटली. पण चोरटयांनी गावकऱ्यांच्या भीतीने कार तेथेच सोडून पळ काढला. त्यामुळे ही केए -०३ ए ई २६२७ क्रमांकाची कारसुद्धा चोरीची असावी असा कयास आहे. गावकऱ्यांनी तालिकोटे पोलिसांना या घटनेची खबर दिली असून त्यांच्या सांगण्यावरून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

 

Tags: