Belagavi

ड्रग्ज केसमध्ये पोलीसांवर दबाव नाही : गृहमंत्री

Share

 ड्रग्ज केसमध्ये पोलीसांवर दबाव येतो या केवळ अफवा आहेत. आमचे पोलीस कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत. दोषींना शिक्षा मिळवून देतील असे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले.

बुधवारी बेळगावात पत्रकारांशी ते बोलत होते. निवेदिका अनुश्री हिला राजकीय पाठबळ असल्याने ड्रग्ज केसमध्ये तिच्याबाबत सॉफ्ट कॉर्नर बाळगण्यात आला आहे का? या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नावर गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र म्हणाले, अशा प्रकरणात कोण कोणाला सहानुभूती दाखवत नाहीत. ड्रग्ज प्रकरणाबाबत सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. कोणाला सोडण्याचा प्रश्नच नाही. खऱ्या अपराध्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. कोणी कितीही प्रभावी असले तरी कारवाई ही होणारच. आरोपपत्रातून नाव वगळण्याचा प्रश्नच येत नाही. याबाबत माहिती घेऊन सांगेन असे ते म्हणाले.

यमकनमर्डी पोलीस ठाण्यातून सोने गायब झाल्याप्रकरणी संबंधित प्रश्नावर गृहमंत्री म्हणाले, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दोषींना अटक केली आहे. तपास सुरु असल्याने काही सांगता येणार नाही. तपास गांभीर्याने करण्याची सूचना दिली आहे. पण आरोपी कोणीही कितीही मोठा असला तरी सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही. कोणाच्याही दबावाला बळी न पडत सत्य बाहेर आणले जाईल असे ते म्हणाले.

अनेक पोलीस व अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून असल्याबाबतच्या प्रश्नावर गृहमंत्री ज्ञानेंद्र म्हणाले, ५ वर्षांपासून एकाच ठाण्यात असलेल्या पोलिसांची बदली केली आहे. कॉन्स्टेबलच्या बदल्या पोलीस अधीक्षक स्तरावर होतात. एएसआय पदापासून वरच्या बदल्या आयजीपी स्तरावर केल्या जातात. अशा अनेक बदल्या करायच्या आहेत. सरसकट बदल्या करून पदे रिक्त ठेवणेही जमत नाही. त्याशिवाय अनुभवी, त्या प्रसाराची माहिती असलेले पोलिसही ठाण्यात असणे आवश्यक आहे.

कोरोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबाना आर्थिक मदत देण्याची योजना आहे. अशा प्रकरणात सुमारे ३० लाख रु मिळतात. केएसआरपीमध्ये अनेकांना याचा लाभ देण्यात आला आहे. अद्याप किती कुटुंबाना लाभ द्यायचा आहे याची आकडेवारी माझ्याकडे नाही. राज्यात १०० नवी पोलीस ठाणी आणि तुरुंग बांधण्यात येत आहेत. असलेल्या तुरुंगांत बराकींची संख्या वाढविण्यात येईल असे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले.

 

Tags: