गणेशोत्सवासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्वानी पालन करावे असे आवाहन मार्केट उपविभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी केले.

बेळगावातील मार्केट उपविभागांतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी बुधवारी बैठक घेतली. यावेळी सर्व गणेशोत्सव मंडळांनी ५ दिवस सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील यांनी, बेळगावातील सर्वच गणेशोत्सव मंडळे पारंपारिकरित्या १० दिवसांचाच गणेशोत्सव साजरा करतात. त्यामुळे कोविड मार्गसूची पाळून १० दिवसांचाच गणेशोत्सव साजरा करू द्यावा. ५ दिवसांच्या गणेशोत्सवाची जबरदस्ती केल्यास, ५ दिवसानंतर श्रीमूर्ती विसर्जनाची जबाबदारी सरकार आणि पोलिसांवरच राहील असा इशारा दिला. 
यावेळी मंडळांना उद्देशून बोलताना एसीपी सदाशिव कट्टीमनी म्हणाले, देशाचे कायदे सर्वानाच पाळावे लागतील. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सरकारी आदेशानुसार गणेशोत्सव साजरा केला पाहिजे अशी सूचना उत्सव मंडळांना केली.
यावेळी सीपीआय मल्लिकार्जुन तुळसीगेरी, पीएसआय विठ्ठल, लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे विजय जाधव, राजेश खटावकर, सुनील जाधव, बाबुलाल राजपुरोहित आदी उपस्थित होते.


Recent Comments