येनकेन प्रकारे बेळगाव महानगर पालिका ताब्यात घेण्यात भाजपला अखेर यश आले आहे. बिगशॉट नेत्यांचा प्रचार दोन्ही आमदारांचे रणतंत्र यामुळे हे यश मिळाले आहे. या विजयावर जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके यांनी आनंद व्यक्त केला आहे.
होय, बेळगाव पालिकेची निवडणूक भाजप नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरली होती. त्यातही स्थानिक भाजप आमदारांसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न बनला होता. त्यामुळे काहीही करून मनपा निवडणूक जिंकायचीच असा निर्धार करून भाजपने ३६ वार्डांत विजय मिळवत मनपा ताब्यात घेतली आहे. निवडणुकीची धुरा सांभाळलेल्या जलसंसाधन व जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसारित करून बेळगाव शहरवासीयांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे प्रशासन लोकांना आवडले आहे. कोरोना संकट, महापूर अशा स्थितीतही भाजप चांगला कारभार करत आहे. बेळगाव पालिका निवडणुकीची धुरा मीच सांभाळली होती. प्रदेशाध्यक्षांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. पक्षनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केले आहे. बेळगाव मनपात सत्तेवर येण्यासाठी आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत. आमचा विजय हा आमच्या चांगल्या कारभाराची पोचपावती आहे असे कारजोळ म्हणाले.बेळगावात भाजप उमेदवारांच्या विजयात बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. त्यांनी दिवसरात्र केलेल्या प्रयत्नांमुळे नवा इतिहास निर्माण होऊन पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. पक्षाच्या विजयावर प्रतिक्रिया देताना आ. अभय पाटील यांनी विकासकामे पाहून पक्षाला निवडून देणाऱ्या बेळगावच्या मतदारांचे आभार मानले. विकास आणि कार्यकर्त्यांच्या श्रमामुळे आम्हाला विजय मिळाला. आमचे नगरसेवक जनतेच्या अशा-आकांक्षा पूर्ण करतील याचा मला विश्वास आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती काँग्रेसची बी टीम होती. मनपा निवडणुकीत समितीची बी टीम काँग्रेस झाली आहे अशी टीका त्यांनी केली.
बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांनीही भाजप उमेदवारांच्या विजयासाठी मोठे योगदान दिले आहे. आपल्या उमेदवारांच्या विजयाच्या आनंदात तरंगत असलेल्या आ. बेनके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, जात, भाषा भेदभाव न करता मतदारांनी उमेदवारांवर विश्वास ठेवून निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. प्रचारात उतरलेल्या जिल्हा व राज्यातील नेत्यांचीही त्यांनी आभार मानले. ‘पहिल्यांदाच बॅटिंग करताना आम्ही सिक्सर मारला’ याचा आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया आ. बेनके यांनी दिली.
एकंदर भाजप नेत्यांच्या प्रयत्नाने बेळगाव महानगर पालिकेत पहिल्यांदाच कमळ फुलले असून, भाजपचा दरबार सुरु होणार आहे. त्यांनी कुंदानगरी बेळगावचा सर्वांगीण विकास करावा हीच सगळ्यांची अपेक्षा आहे.
Recent Comments