महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच पक्षीय पातळीवर लढवण्यात आलेल्या बेळगाव मनपाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ३६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव मनपा आपल्या ताब्यात ठेवलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा अनपेक्षित प्रभाव झाला आहे. समितीला केवळ एकाच जागांवर समाधान मानावे लागले आहे.
बेळगाव मनपाची यावेळची निवडणूक प्रथमच पक्षीय पातळीवर लढवण्यात आली. भाजप व काँग्रेस या २ प्रमुख पक्षांनी आपापल्या पक्षचिन्हांवर निवडणूक लढवली. त्यापाठोपाठ जेडीएसनेही पक्षचिन्हावर निवडणूक लढवली. आम आदमी पक्षानेही प्रथमच निवडणुकीत उतरून क्षमताचाचणी केली. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले होते. शुक्रवारी ३ सप्टेंबरला झालेल्या मतदानानंतर सोमवारी ६ सप्टेंबरला मतमोजणी करण्यात आली. प्रारंभापासूनच भाजपने मतमोजणीत आघाडी घेतली. अखेरपर्यंत हा कल असाच राहिला.
एकूण ३६ जागांवर भाजपने बाजी मारत निर्विवाद बहुमत सिद्ध केले. काँग्रेसने ९ जागांवर विजय मिळवला. तर महाराष्ट्र एकीकरण समितीला केवळ एकच जागा मिळाली. एमआयएमने एका जागेवर विजय मिळवला. अन्य जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. बेळगाव शहरात भाजपचे २ आमदार असून त्यांनी तसेच पक्षाने बेळगाव पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. कर्नाटकात सत्तेवर असलेल्या भाजपने बड्या नेत्यांची फौजच प्रचारात उतरवली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष, अनेक मंत्र्यांनी बेळगावात येऊन जोरदार प्रचार केला होता. त्यापुढे इतरांचा प्रचार फिका पडला आणि भाजपने एकहाती विजय मिळवला.
Recent Comments