कोरोनामुळे २ मुले आणि वडील दगावल्याने शेतकरी कुटुंब उघड्यावर पडले आहे. तरीही कर्जफेडीसाठी पीएलडी बँकेने तगादा लावला आहे. याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या वतीने निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांसह एकाच कुटुंबातील तिघेजण मरण पावल्याने हे कुटुंब वाऱ्यावर आले आहे. तरीही पीएलडी बँकेकडून कर्जफेडीसाठी दबाव आणण्यात येत असल्याच्या निषेधार्थ बेळगावात शनिवारी शेतकरी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना शेतकरी नेते एम. सी. कांबळे म्हणाले, अथणी तालुक्यातील पार्थनहळ्ळीतील शेतकरी दस्तगीर इब्राहिम मोळे, मोदीनसाब मोळे आणि बशीर मोळे अशा बाप व २ मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरात आता केवळ लहान मुले आणि महिला असून कुटुंबाचे पोट भरणे कठीण झाले आहे. जिवंत असताना त्यांनी कर्जाचे हप्ते नियमित भरले आहेत. आता पीएलडी बँक या कुटुंबाची परिस्थिती न पाहता त्यांचे शेत जप्त करण्याची धमकी देत आहे. त्यामुळे या कुटुंबाचे रक्षण करावे अशी मागणी कांबळे यांनी केले.
शेतकरी नेत्या जयश्री गुरन्नावर यांनी आक्रमकपणे भूमिका मांडताना या शेतकऱ्यांनी जिवंत असेपर्यंत ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले आहेत. आता शेतकरी व त्याची दोन्ही मुले हयात नसल्याने कर्ज फेडणे कुटुंबाला कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी केली.
कोविड संकटात शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र अशा परिस्थितीत एखाद्या निराधार कुटुंबाला कर्जफेडीसाठी असे वेठीला धरणे कितपत योग्य आहे असा प्रश्न शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.
Recent Comments