कित्तूरचे आ. महांतेश दोड्डगौडर यांनी एखाद्या राजा–महाराजाच्या थाटात आपला वाढदिवस साजरा केल्याचा विडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून त्यामुळे जनतेमध्ये नाराजी उमटत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केल्याचे दिसून येत आहे.

होय, कित्तूरचे भाजप आमदार महांतेश दोड्डगौडर यांचा नुकताच वाढदिवस झाला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या बैलहोंगल येथील निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. यात बैलहोंगलचे डीवायएसपी, सीपीआय, नेसरगीचे पीएसआय आणि एका एएसआयचा समावेश होता. या सगळ्यांनी आमदारांवर पुष्पवृष्टी केली. आ. दोड्डगौडर आणि त्यांच्या पत्नीने कोचावर बसून एखाद्या राजा-राणीप्रमाणे ही पुष्पवृष्टी करवून घेतली. अशा पद्धतीने आ. दोड्डगौडर यांनी आपला वाढदिवसाचा दरबार भरविला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुलामाप्रमाणे वर्तन केले असा आरोप जनतेतून होत आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या या वर्तनाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी प्रतिक्रिया देताना, याबाबत आपणाला माहिती नाही. संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले. काहीही असले तरी एखाद्या राजकारण्यासमोर पोलिसांचे असे वागणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता जनतेतून विचारण्यात येत आहे.


Recent Comments