कागवाडचे आ. श्रीमंत पाटील याना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्याची माहिती क्षत्रिय मराठा परिषदेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब जाधव यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीची माहिती मराठा समाजातील कार्यकर्त्यांना देण्यासाठी कागवाड येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी बोलताना बापूसाहेब जाधव म्हणाले, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने आ. श्रीमंत पाटील याना मंत्रिपद देण्याची मागणी करण्यात आली. राज्यात ७० लाखांहून अधिक मराठा समाज आहे. समाजावर अन्याय केल्यास आणि महिन्याच्या आत मागण्या मान्य न केल्यास आंदोलन करावे लागेल असा इशारा दिल्याचे त्यांनी सांगितले.
माजी जि. पं. सदस्य आर. एम पाटील यांनी सांगितले की, राज्यातील मराठा समाज अनेक वर्षांपासून भाजपवर विश्वास ठेवून ग्रा. पं. पासून ते लोकसभेपर्यंत भाजपला पाठिंबा देत आला आहे. त्यामुळे श्रीमंत पाटील याना मंत्रिपद देऊन समाजाला न्याय द्यावा. आमची विनंती मान्य करून मुख्यमंत्र्यांनी निश्चितपणे श्रीमंत पाटील याना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले आहे असे पाटील यांनी सांगितले.
अथणी तालुका क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष विनायक देसाई म्हणाले, कर्नाटकात आजवरच्या प्रत्येक सरकारमध्ये मराठा समाजाला मंत्रिपद देण्यात आलेले आहे. श्रीमंत पाटील याना आधी मंत्रिपद देण्यात आले. पण बोम्मई मंत्रिमंडळात त्यांना वगळण्यात आले. जर त्यांना पुन्हा मंत्रिपद दिले नाही तर पुढील निवडणुकीत भाजपला पाठिंबा द्यावा किंवा नाही याचा विचार करावा लागेल असा इशारा दिला. येडियुरप्पा सरकार सत्तेवर येण्यासाठी श्रीमंत पाटील यांनी मंत्रिपदाचा त्याग करून सरकार रचनेत प्रमुख भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्यासाठी कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष शामसुंदर गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी दिलीप पवार, सुधाकर भगत, अभय पाटील आदी उपस्थित होते.
Recent Comments