बेळगाव मनपा निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने मोफत अंत्यसंस्कार करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी गंगायात्रा घडविली आहेच आता स्मशानयात्रा घडविणे तेवढेच बाकी आहे अशी बोचरी टीका बेळगाव ग्रामीण आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली.
शुक्रवारी बेळगाव मनपा निवडणुकीसाठी प्रभाग ३१ मधील श्रीसाई कर्नाटक प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, पुत्र मृणाल हेब्बाळकर आदी उपस्थित होते. फ्लो
मतदानानंतर बोलताना आ. हेब्बाळकर म्हणाल्या, दरवेळी मी मतदान करते. हा घटनात्मक अमूल्य हक्क बजावल्यानंतर मला समाधान मिळते. बेळगाव मनपाची निवडणूक आम्ही पक्षचिन्हावर लढवली आहे. म. ए. समितीने अपक्ष म्हणून उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि भाजप पक्ष चिन्हावर रिंगणात उतरले आहेत. एकंदर ही त्रिकोणी स्पर्धा असेल. यावेळी मतदार बेळगाव मनपा काँग्रेसकडे सोपवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रात आणि राज्यात भाजपसह सरकार आहे. शहरातही दोन्ही आमदार भाजपचे आहेत. मग त्यातील एकाला मनपा आयुक्तांच्या घरासमोर कचरा टाकण्याची वेळ का आली? याला काय अर्थ आहे? असा सवाल त्यांनी केला. यावरून मनपा प्रशासन त्यांच्या ताब्यात नाही हे सिद्ध होते. सिद्रामय्यांचे सरकार असताना त्यांनी जाती, धर्म, भाषा असा भेद न करता बेळगावच्या विकासासाठी मनपाला ३ वेळा १०० कोटींचे अनुदान दिले होते. संपूर्ण देशातच बेळगावची स्मार्टसिटी प्रकल्पासाठी निवड झाली. परंतु अजून बेळगाव स्मार्टसिटी झालेली नाही अशी टीका आ. हेब्बाळकर यांनी केली.
एकंदर बेळगाव मनपावर काँग्रेस ताबा मिळवेल असा विश्वास आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.
Recent Comments