Belagavi

मनपा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण, निर्भयपणे मतदान करा : जिल्हाधिकारी

Share

 बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी बेळगावकरांना केले आहे

होय, बेळगाव पालिकेच्या नव्या सभागृहासाठी उद्या मतदान घेण्यात येणार आहे. गुरुवारी निवडणूक तयारीची माहिती जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. ते म्हणाले, एकूण ५८ प्रभागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी ४०२ मूळ मतदान केंद्रे तर १३ उप मतदान केंद्रे अशी एकूण ४१५ केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांत सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महिला मतदारांची संख्या अधिक म्हणजे, २,१६,०१९ असून २,१५,३६४ पुरुष मतदार आहेत.  ४,३१,३८३ एकूण मतदार आहेत. ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात येणार असून ५६२ अतिरिक्त ईव्हीएम तयार ठेवण्यात आली आहेत. ४१५ मतदान केंद्रांसाठी केंद्रनिहाय ४ याप्रमाणे ४५७ पथके तर १८२८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ईव्हीएम व अन्य सामग्री घेऊन आज सायंकाळीच कर्मचारी त्यांच्या नियुक्त केंद्रांवर रवाना होतील असे ते म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर सॅनिटायझर, मास्कसहित सर्व उपाययोजना केल्या आहेत. सर्व केंद्रांवर आरोग्य कर्मचारीही तैनात करण्यात येतील. निवडणूक ड्युटीवर बहुतकरून शिक्षकांची नेमणूक केली आहे. शाळा सुरु होणार असल्याने शिक्षकांनी लशींचे दोन्ही डोस घेतल्याने अनुकूल झाले आहे. निवडणूक काळात दारूच्या चोरट्या व्यवहारांवर अबकारी खात्याने अंकुश आणला आहे. १४०० लिटर इंडियन मेड लिकर, २२८ लिटर बीयर, २६० लिटर हातभट्टीची दार आणि ६ वाहने असा मुद्देमाल खात्याने जप्त केला आहे असे ते म्हणाले.

बेळगाव मनपा निवडणुकीसोबतच रायबाग नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ९ आणि सौंदत्ती नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. २३मध्ये पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या सर्व निवडणुकांसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून कर्तव्य पार पाडावे असे आवाहन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी केले.

 

 

Tags: