स्मार्टसिटी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे लाखो लिटर मौल्यवान पाणी नाहक वाया गेल्याची घटना बेळगावात घडली आहे.
होय, सुभाषनगरातील जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर जलवाहिनीला सोमवारी रात्री गळती लागली. तेथे दुरुस्ती करण्यासाठी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्मार्टसिटी योजनेच्या अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. पण स्मार्टसिटीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी ती दिली नाही. त्यामुळे एल अँड टीच्या अधिकाऱ्यांनाही गप्प बसावे लागले. मात्र त्यामुळे गेल्या २ दिवसांत लाखो लिटर पाणी नाहक वाया गेले. त्यामुळे चौफेर टीका झाल्याने बुधवारी स्मार्टसिटीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी एल अँड टीच्या अधिकाऱ्यांना दुरुस्तीची अनुमती दिली. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आणखी २ दिवस वीरभद्र नगर, सुभाषनगर, मिशन कंपौंड आदी परिसरात सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी शहरात अनेक ठिकाणी अवैज्ञानिक पद्धतीने विकासकामे केल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे. जोवर स्मार्टसिटीचे अधिकारी योग्य आणि वैज्ञानिक पद्धतीने जलवाहिनी आणि ड्रेनेज लाईनसह अन्य विकासकामे करत नाहीत तोवर असेच नुकसान आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागणार हे निश्चित ! अशा प्रतिक्रिया स्थानक नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहेत.
Recent Comments