बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत ४५ प्लस हे आमचे टार्गेट पूर्ण होऊन भाजप सत्ता मिळवेल असा विश्वास धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केला.
सोमवारी बेळगाव मनपा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाल्यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, ५०% पुरुषांप्रमाणेच ५०% महिला उमेदवारही निवडणूक लढवत आहेत याचा मला विशेष आनंद झाला. काल ६ प्रभागात प्रचार केला असून आजही ६ प्रभागात प्रचार करणार आहे. सर्वत्र भाजपला जनतेकडून चांगला पाठिंबा मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके, खा. मंगल अंगडी यांनी केलेली विकासकामे याबाबत लोक सांगत आहेत. त्याचप्रमाणे चांगला प्रतिमेच्या उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आमचे ४५ प्लसचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमच्या महिला उमेदवार सुशिक्षित आहेत. लोकांशी त्यांचे वर्तनही चांगले आहे हे मी स्वतः पहिले आहे. त्याशिवाय आमच्या युवा कार्यकर्त्यांनी कोविडकाळात खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे भाजपचे अधिकाधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देणे जोल्ले यांनी टाळले. पालिका निवडणुकीत भाजपचा प्रतिस्पर्धी कोण या प्रश्नावर, कोणताही जात, पक्ष भेद नाही. सगळे पक्षचिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना होईल असे सांगितले.
एकंदर भाजप उमेदवाराचा मंत्री शशिकला जोल्ले यांनी जोरदार प्रचार सुरु केला असून, मनपा निवडणुकीत भाजपच बाजी मारेल असा दावा त्यांनी केला आहे.
Recent Comments