महाराष्ट्र एकीकरण समिती आणि हैदराबादच्या एमआयएमची युती होण्याची खबर म्हणजे, बेळगावला लागलेला कला डाग आहे अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री व विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केली.
बेळगावात शनिवारी मनपा निवडणुकीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सवदी म्हणाले, बेळगावचे लोक शहाणे, दूरदृष्टी बाळगणारे आणि राजकीय इच्छाशक्ती असलेले आहेत. त्यामुळे एमईएस आणि एआयएमच्या युतीला ते जवळ करणार नाहीत. केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार असल्याने बेळगावचा विकास व्हायचा असेल तर भाजपलाच लोकांनी मतदान करावे असे आवाहन सवदी यांनी केले.
उमेदवारी वाटपात भाजपने लिंगायत समाजावर अन्याय केल्याबाबतच्या प्रश्नावर सवदी म्हणाले, उमेदवारी देताना वार्डात कोणते आरक्षण जाहीर झाले आहे याचा विचार करावा लागतो. अनेक वर्षांपासून आपले जीवन पक्षाला समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाती-पतीचा विचार न करता, त्यांनी पक्षासाठी केलेले कष्ट विचारात घेऊन उमेदवारी दिली आहे असे ते म्हणाले.
काँग्रेसवाले कधीही कोणाशीही युती करतात. एमआयएम, एमइएससोबतही ते युती करतील. एवढेच काय, परदेशातूनही एखादा पक्ष आला तरीही त्यांच्याशीही ते युती करतील. कारण काँग्रेस मोडकळीला आलेला पक्ष आहे. आपले अस्तित्व राखण्यासाठी ते कोणाशीही कधीही युती करू शकतात. आम्ही मात्र कधीच काँग्रेसशी हातमिळवणी करणार नाही असे सवदी यांनी सांगितले.
Recent Comments