Belagavi

रिव्हॉल्व्हर मिरवत फिरणे पडले महागात ! पोलिसांनी परवानाच केला रद्द !

Share

रुबाब झाडण्यासाठी कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही. बेळगावात भर बाजारात कमरेला रिव्हॉल्व्हर लटकावून मिरवत फिरणे एकाला चांगलेच महागात पडले असून, त्याचा परवानाच पोलिसांनी रद्द केला आहे.

खडेबाजार ही बेळगावची मुख्य बाजारपेठ. या भर बाजारात एक व्यक्ती सर्वाना दिसेल असे कमरेला रिव्हॉल्व्हर लटकावून मिरवत फिरत होती. आर्यन हॉटेलसमोर ही व्यक्ती अशा तर्हेने फिरताना पाहून लोकांमध्ये काहीशी दहशतही निर्माण झाली. कोणीतरी या व्यक्तीचा फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. सध्या बेळगावात महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता शस्त्रात्र प्रतिबंधक कायद्यांचा अमल सुरु आहे. अशा परिस्थितीत शस्त्रात्र बाळगणे गुन्हा आहे. त्यामुळे खडेबाजार पोलिसांनी स्वयंदखल तक्रार दाखल करून या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा नोंदविला. एवढेच नाही तर पोलिसांनी रिव्हॉल्व्हर आणि लायसन्स जप्त केले. शिवाय रिव्हॉल्व्हरचा परवानाही रद्द केला.

Tags: