भाजप, काँग्रेस आणि जेडीएस या तिन्ही राष्ट्रीय पक्षांनी बेळगाव मनपा निवडणुकीत उमेदवारी देताना लिंगायत समाजावर अन्याय केल्याची भावना प्रबळ झाली आहे. त्यामुळे यावेळी या तिन्ही पक्षांना चांगलाच धडा शिकवण्याचा निर्धार लिंगायत समाजाने केला आहे.
बेळगावातील शिवबसव नगरातील लिंगायत भवनात बुधवारी सायंकाळी लिंगायत समाजाच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी यासंदर्भात तपशीलवार चर्चा करण्यात आली. समाजाकडे दुर्लक्ष करून भाजप, काँग्रेस आणि जेडीएस या तिन्ही राष्ट्रीय पक्षांनी लिंगायत समाजावर अन्याय केला आहे. त्यांना आमची शक्ती काय आहे हे दाखवून चांगलाच धडा शिकवायला हवा अशी मागणी यावेळी अनेक लिंगायत नेत्यांनी केली. खासकरून भाजपवर समाजाच्या युवा नेत्यांनी आगपाखड केली. आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके यांनी आमच्यावर खूप अन्याय केला आहे अशी व्यथा त्यांनी मांडल्याचे समजते.
या बैठकीत राजीव टोपन्नावर, चेतन अंगडी, महांतेश वककुंद, सुजित मुळगुंद, अण्णासाहेब देसाई, मल्लिकार्जुन सत्तीगेरी, अरविंद पाटील आदी सहभागी झाले होते. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना वीरशैव महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद म्हणाल्या, बेळगाव मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना राजकीय पक्षांनी वीरशैव लिंगायत समाजावर अन्याय केला आहे. दक्षिण विधानसभा मतदार संघात केवळ एकच जागा समाजाला दिली आहे. तर उत्तर मतदारसंघात ५ जागा दिल्या आहेत. दक्षिण मतदारसंघात आमचे ३० हजार तर उत्तर मतदारसंघात ८० हजार मतदार आहेत. भाजप, काँग्रेस आणि जेडीएस या तिन्ही राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारी वाटपात आमच्या समाजावर अन्याय केला आहे. काँग्रेसने समाजाला १० तर भाजपने ६ जागा दिल्या आहेत अशी नाराजी व्यक्त केली.
लिंगायत नेते बसवराज रोट्टी म्हणाले, राजकीय पक्ष लिंगायतांचा निवडणुकीत व्होट बँक म्हणून वापर करतात, समाजाच्या कार्यकर्त्यांना आपल्या विजयासाठी राबवून घेतात. जादातर भाजपकडून हे धोरण राबवले जाते. भाजप पक्षबांधणी, प्रचार आणि विजयासाठी लिंगायतांचा वापर करून घेतो. मात्र त्यांना कोणतेही मानाचे स्थान देत नाही. या अन्यायाबाबत लिंगायत समाज आता पेटून उठला असून निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा रोट्टी यांनी दिला.
एकंदर, आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात लिंगायत समाजाने आता तिन्ही राष्ट्रीय पक्षांविरुद्ध उघड शड्डू ठोकला आहे. त्याचा या पक्षांना मनपा निवडणुकीत कितपत फटका बसणार हे पहावे लागेल.
Recent Comments