Belagavi

डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप

Share

 हर्नियाचे ऑपरेशन करण्यासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या एका व्यक्तीचा मृतदेहच घरी नेण्याची वेळ डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे कुटुंबियांवर आल्याची घटना बेळगावात घडली आहे. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबीय ग्रामस्थांनी न्यायासाठी जिल्हा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत.

होय, बेळगाव तालुक्यातील मणिकेरी गावातील सन्नप्पा पाटील असे या घटनेतील मृताचे नाव आहे. न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगण्याची वेळ त्याच्यावर आली. हर्नियाचे ऑपरेशन करून घेण्यासाठी तो आपली पत्नी सुरेखा हिच्यासोबत बेळगावातील रामलिंग खिंड गल्लीतील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी अर्ध्या तासात ऑपरेशन कर असे सांगून तेथील डॉक्टरांनी रुग्णाला बाहेर जाऊ दिले नाही. त्यामुळे पत्नी सुरेखाने घाबरून जात ग्रामस्थांना ही घटना कळवली. ग्रामस्थांनी येऊन चौकशी केल्यावर, ‘तुमचा रुग्ण गंभीर आहे, दुसऱ्या इस्पितळात घेऊन जा’ असा सल्ला देण्यात आला. त्यानुसार ग्रामस्थांनी रुग्णाला धन्वंतरी रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी तुमचा रुग्ण दगावून बराच उशीर झाला आहे असे सांगितले.या घटनेने धक्का बसलेल्या पत्नी सुरेखाने खडेबाजार पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री तक्रार दाखल केली आहे. बुधवारी सकाळी कुटुंबीय व ग्रामस्थांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी आणि शहर पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन याना निवेदन दिले. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळेच रुग्ण सन्नप्पा यांचा मृत्यू झाल्याने संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना सन्नप्पा यांची पत्नी सुरेखा यांनी सांगितले की, अश्विनी रुग्णालयात पतीला नेल्यावर अर्धा तासात बरे करून घरी पाठवतो असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. मात्र त्यांनी ऑपरेशन नीट केले नाही. त्यामुळे पती दगावला. मला ३ लहान मुले आहेत, आम्ही भाजीविक्री करून कुटुंब चालवत होतो, आता आमची दशा काय असा सवाल तिने केला.

यासंदर्भात केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी, डॉक्टरांच्या चुकीमुळेच रुग्णाचा मृत्यू झाला का याची चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्याचप्रमाणे या गरीब कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी मागणी केली.

एकंदर, भाजीविक्री करून कुटुंब चालवणाऱ्या कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूने एक गरीब कुटुंब वाऱ्यावर आले आहे. त्यामागे डॉक्टरांची चूक आहे का अन्य काही कारण याचा छडा पोलिसांनी लावला पाहिजे.

 

Tags: