सार्वजनिक ठिकाणी १० बाय १० फूट जागेत सार्वजनिक गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करण्यास परवानगी देण्याची मागणी बेळगावातील मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. यंदा सरकारने सार्वजनिक गणेश मंडळांना अनेक कठीण निर्बंध घातले आहेत. त्यामुळे गणेश मंडळांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक मंडळांना देवस्थान, समुदाय भवनात श्री मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी १० बाय १० फूट जागेत सार्वजनिक गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. कोविड नियमावलीनुसार आम्ही गणेशोत्सव साजरा करू अशी हमी त्यांनी दिली. यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले की, बेळगाव मनपाची निवडणूक संपताच शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांची बैठक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या मागण्या सरकारपुढे मांडण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, सरचिटणीस शिवराज पाटील, सतीश गोरगौंडा, मदन बामणे, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.
Recent Comments