जगभरात उलथापालथ माजवलेल्या कोविड परिस्थितीमुळे शाळा – महाविद्यालयेदेखील बंद करण्यात आली होती. परंतु सध्या कर्नाटक राज्य सरकारने शाळा – महाविद्यालये पुन्हा एकदा भरविण्यासंदर्भात निर्णय घेतला असून आज राज्यभरातील शाळा – महाविद्यालयाचे आवार गजबजलेले दिसून आले. बेळगावमधील शाळा – महाविद्यालयांमध्ये आज विद्यार्थ्यांनी हजेरी लावलेली दिसून आली शिवाय विद्यार्थी वर्गात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
गेल्या साडेचार महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांचे आवार आज पुन्हा एकदा गजबजलेले दिसून आले. राज्यभरासह आज बेळगावमध्येदेखील शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात उत्साहपूर्वक वातावरणात झाली. राज्यभरातील २६ जिल्ह्यातील जवळपास १६ हजार हायस्कुल, ५०० हुन अधिक महाविद्यालयांचे वर्ग आज भरविण्यात आले. बेळगावमधील विविध शाळांचे आवार आज सकाळी १० वाजल्यापासून गजबजलेले दिसून आले. बेळगावमधील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फलक सजविण्यात आले आहे. वंटमुरी कॉलनी येथील सरकारी हायस्कुलचा प्रवेशद्वार आज नारळाच्या झाडाच्या फांद्यांनी सजविण्यात आला होता. अनेक दिवसांनी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे आज शिक्षकांनी उत्साहात स्वागत केले. थर्मल स्क्रीनिंग सह कोविड मार्गसूची आणि खबरदारीचे उपाय देखील पाळण्यात आले. सामाजिक अंतर, मास्कचा वापर आणि कोविड संदर्भातील सर्व आवश्यक त्या खबरदारी बाळगून विद्यार्थ्यांनी आज शाळेत प्रवेश केलेला दिसून आला.याचप्रमाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या वनिता विद्यालयातदेखील असेच चित्र पाहायला मिळाले. सरकारी मार्गसूचीनुसार आज शाळेला प्रारंभ करण्यात आला असून सामाजिक अंतर राखत विद्यार्थ्यांनी प्रार्थनेला उपस्थिती दर्शविली. शिवाय शाळेच्या प्रांगणात प्रार्थनेसाठी सामाजिक अंतर राखावे यासाठी मार्किंग देखील करण्यात आले होते. त्याचपद्धतीने प्रत्येक वर्गात शाळेचे वेळापत्रक योग्यरितीने लावलेले दिसून आले. एकूण विद्यार्थ्यांच्या दोन गट तयार करून एका वर्गखोलीत केवळ २० विद्यार्थ्यांना बसवून वर्ग सुरु करण्याची परवानगी आहे. यामुळे या मार्गसूचीनुसार शाळेत सर्व तयारी करण्यात आली होती. शाळेत नोटीस बोर्डवर कोविड संदर्भातील विविध संदेश लिहिण्यात आले होते. कोविड संदर्भात जागृती करण्यासाठी शाळेतील इतर फलकांवर जागृतीपर संदेश लिहिण्यात आले होते. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळांचे आवार आज पुन्हा एकदा भरलेले दिसून आले. शिवाय कोविड पार्श्वभूमी असून देखील विद्यार्थी आणि शिक्षक उत्साहात शाळेत उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले.
Recent Comments