Belagavi

बेळगाव मनपा निवडणूक : अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी

Share

बेळगाव महानगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर आज विविध पक्षाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अर्ज भरणा केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

काँग्रेस आणि भाजपाने बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना ‘बी फॉर्म’ देऊ केला. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी विविध अर्ज भरणा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. बेळगाव मनपा कार्यालयासह इतर १२ ठिकाणी अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यानुसार भाजप, काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समिती, आम आदमी पार्टी, जेडीएस., एएमआयएम यासह अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केंद्रावर एकच गर्दी केली.उमेदवारांची गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी अर्ज भरणा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना डीसीपी डॉ. विक्रम आमटे म्हणाले कि, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांना निवडणुकीचा प्रचार कोणत्या पद्धतीने करायचा, यासंदर्भात मार्गसूची देण्यात आली. पाच जणांहून अधिक व्यक्ती प्रचारात भाग घेऊ शकत नाहीत. घरोघरी जाऊन प्रचार करावा. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रचारावर भर द्यावा. कोणत्याही नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही डॉ. विक्रम आमटे यांनी दिला.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठरविण्यात आलेल्या १२ केंद्रांच्या परिसरात १४४ कलाम लागू करण्यात आला असून रहदारीला अडथळा होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. शहरात सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, पालिका अधिकारी यांच्याशी आवश्यक ती पावले उचलल्यासाठी चर्चा करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील भागात मी स्वतः पाहणी केली असल्याचे डीसीपी डॉ. आमटे यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २६ ऑगष्ट असून बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत एकूण किती उमेदवार रिंगणात उतरून आपले नशीब आजमावणार आहेत, हे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

Tags: