खूनप्रकरणात ९ महिन्यांच्या तुरुंगवारीनंतर काँग्रेसनेते व माजी मंत्री विनय कुलकर्णी यांची शनिवारी सकाळी हिंडलगा तुरुंगातून सुटका करण्यात आली. आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राखी बांधून त्यांचे स्वागत केले.: धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगेशगौडा यांच्या हत्येप्रकरणी काँग्रेस नेते व माजी मंत्री विनय कुलकर्णी बेळगावच्या हिंडलगा तुरुंगात तब्बल ९ महिने १६ दिवस कैद होते.
सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नुकताच सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आज, शनिवारी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. सुटकेनंतर बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विनय कुलकर्णी याना राखी बांधून त्यांचे स्वागत केले. या दरम्यान, पत्रकारांशी बोलताना आ. हेब्बाळकर म्हणाल्या, माझे व विनय कुलकर्णी यांचे राजकारणापलीकडेही भावा-बहिणीचे नाते आहे.
त्यामुळे भावाच्या स्वागतासाठी मी आले आहे. उद्या रक्षाबंधनाचा सण आहे. त्यामुळे त्यांना राखी बांधून धीर देण्यासाठी मी आले आहे. सध्या त्यांच्यावर कोर्टात केस सुरु आहे. त्यामुळे त्या मुद्यावर मी अधिक काही बोलणार नाही. त्यांना अडकवण्यासाठी षडयंत्र रचले आहे का यामागे काही राजकारण आहे यावर पुन्हा कधीतरी बोलेन असे आ. हेब्बाळकर यांनी सांगितले.
Recent Comments