केएलई अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचा (काहेर) ११वा पदवीदान सोहळा बेळगावात गुरुवारी उत्साहात पार पडला. जे एन मेडिकल कॉलेजच्या आवारातील केएलई सेंटेनरी कन्व्हेक्शन हॉलमध्ये गुरुवारी काहेरच्या ११व्या पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पाहुण्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना मिरवणुकीने, सन्मानाने व्यासपीठावर नेण्यात आले.
हैदराबादच्या एशियन इन्स्टिटयूट ऑफ गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजि हॉस्पिटलचे मुख्य गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. काहेरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना डॉ. डी. नागेश्वर रेड्डी म्हणाले, अत्युच्च शिक्षण देणाऱ्या जगातील सुसज्ज विद्यापीठांपैकी काहेर विद्यापीठ एक आहे. याचा कॅम्पस आणि शिक्षणाच्या सुविधा उत्तम आणि जागतिक दर्जाच्या आहेत. स्वप्ने जादूने पूर्ण होत नाहीत. त्यासाठी सतत अभ्यास, जिद्द, चिकाटी लागते. कठीण परीश्रम घेत, नवनवे प्रयोग करत राहिल्यासच विध्यार्थी जीवनाला परिपूर्णता लाभते असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

काहेरचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी म्हणाले, काहेर हे या भागातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अल्पावधीत नावारूपाला आलेले आरोग्य विद्यापीठ आहे. विध्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांच्या परिश्रमामुळेच हे शक्य झाले आहे. यावर्षी १५६५ विध्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले आहे. त्यात ३५ विध्यार्थ्यानी सुवर्णपदके पटकावली आहेत. १८ पीएचडी, ७ पोस्ट डॉक्टरल, ४६२ पोस्ट ग्रॅज्युएट, ९४२ अंडर ग्रॅज्युएट, ७५ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, १० सर्टिफिकेट कोर्स, १० फेलोशिप आणि ६ डिप्लोमा प्रमाणपत्र प्रदान केली आहेत असे ते म्हणाले. यावेळी प्रा. डॉ. ज्योती नागमोती, प्रा. डॉ. व्ही. ए. कोठीवाले आदी उपस्थित होते.


Recent Comments